पाटणा - देशामध्ये प्लास्टिकचा वापर टाळण्यासाठी अनेक मोहीम राबवल्या जात आहेत. त्याचप्रमाणे नालंदा येथील हिलसा गावातील एक सामाजिक कार्यकर्ता प्लास्टिक बंदीसाठी अभियान चालवत आहे. आशुतोष कुमार मानव, असे त्यांचे नाव आहे. ते गावोगावी जावून प्लास्टिकपासून होणाऱ्या दुष्परिणामांबद्दल माहिती देत असतात.
आशुतोष यांना लहानपणापासूनच सामाजिक कार्य करण्याची आवड होती. त्यानुसार त्यांनी नवव्या वर्गापासूनच सामाजिक कार्यामध्ये सहभाग घेणे सुरू केले. त्यांनी आपल्या मित्रांसोबत मिळून १९९१ मध्ये प्लास्टीक वापराविरोधात पहिले अभियान सुरू केले. त्यानुसार ते प्रत्येक रविवारी नाल्यांची स्वच्छता करीत होते. त्यावेळी प्लास्टीकमुळे पाण्याचा निचरा होत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी संपूर्ण आयुष्य समाज आणि देशाला समर्पित करण्याचे ठरवले. तसेच त्यांनी राजकारणापासून दूर राहून लग्न करायचे नाही, असेही ठरवले आहे.
आशुतोष शाळा-महाविद्यालयामध्ये जावून प्लास्टिकबाबत जनजागृती करीत असतात. ते पर्यावरणाचे नुकसान करणाऱ्या प्लास्टिकच्या उपयोगाविरोधात प्रतिज्ञा घ्यायला सांगतात. त्यांची बोलण्याची शैली पाहून अधिकाअधिक तरुण आकर्षित होतात. लहान-मोठे सर्वजण आशुतोष यांचे ऐकतात, असे बिहार शरीफ महापालिकेचे आयुक्त सौरव कुमार जोरवार यांनी सांगितले.
आशुतोष यांनी यापूर्वी देखील संपूर्ण बिहारमध्ये 'गुटखा छोडो' आंदोलन केले होते. त्यानंतर आता स्वच्छ भारत मिशन आणि जल जीवन हरियाली अभियान चालवत आहेत.