मुंबई - देशामध्ये वाढत्या झुंडबळीच्या (मॉब लिंचिंग) घटनांविरोधात सेलिब्रेटींनी आवाज उठवला आहे. या घटनांमुळे व्यथित झालेल्या विविध क्षेत्रातील ४९ मान्यवरांनी एकत्र येत पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले होते. मात्र, या पत्रावर चित्रपट दिगदर्शक अशोक पंडित यांनी आगपाखड केली आहे. निवडणुका जवळ आल्या की, पावसाळी बेडकं जशी बाहेर येऊन आवाज करतात, तसं हे सेलिब्रिटी निवडणुकांच्या तोंडावर मोदी विरोधात आवाज करत असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.
या सेलिब्रिटींची इच्छा मदत करण्याची नाही, त्यांना फक्त प्रसिद्धी मिळवायची आहे. जर त्यांची खरचं मदत करायची इच्छा असती तर पत्र लिहण्याऐवजी त्यांनी मोदींना भेटून चर्चा केली असती, असे एका टीव्ही कार्यक्रमादरम्यान अशोक पंडित म्हणाले.
२०१९ साली ही पावसाळी बेडकं पुन्हा बाहेर येवून आवाज करतायेत. निवडणुकांच्या आधी यांना बाहेर येवून देशाला शिव्या घाला, असं सांगण्यात आलयं. ही लोकं परदेशात भारताची बदनामी करतात. आम्ही आपल्या देशात जय श्रीराम नाही बोलायचं तर कुठं बोलयचं. ही लोकं पैसे घेऊन निवडणुका आल्या की मोदी विरोधात बोलण्याचं काम करतात, असं अशोक पंडित म्हणाले.
गेल्या काही दिवसांपासून देशभरात झुंडबळीच्या घटना वाढल्या असून त्यात अनेक जणांचा बळी गेला आहे. या घटनांमुळे व्यथित झालेल्या विविध क्षेत्रातील ४९ मान्यवरांनी एकत्र येत पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे. यामध्ये मणिरत्नम, अडूर गोपालकृष्णन, रामचंद्र गुहा, अनुराग कश्यप यांच्यासह कला, साहित्य आणि सामाजिक क्षेत्रातील ४९ जणांचा समावेश आहे. त्यांना अशोक पंडित यांनी फटकारले आहे.
देशभरात मॉब लिंचिंगच्या वाढत्या घटनांविरोधात सेलिब्रेटींनी आवाज उठवला आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहीत चिंता व्यक्त केली होती.