नवी दिल्ली - दिल्ली विधानसभा निवडणूक २०२० मध्ये आम आदमी पार्टीने इतर पक्षांना 'क्लीन स्वीप' देत बाजी मारली. यामध्ये आपच्या ८ महिला उमेदवार विजयी ठरल्या. मात्र, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नव्या मंत्रिमंडळात एकाही महिलेचा समावेश करण्यात आलेला नाही.
आतिशी मार्लेना, राखी बिर्ला, राजकुमारी ढिल्लोन, प्रीती तोमर, धनवती चंडेला, पर्मिला तोकास, भावना गौर आणि वंदना कुमारी या आपच्या महिला उमेदवार विजयी ठरल्या. आपने दिल्ली विधानसभेसाठी ९ महिलांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. यापैकी सरिता सिंग यांना एकमेव पराभवाचा सामना करावा लागला. २०१५ च्या विधानसभा निवडणुकीत आपने ६ महिला उमेदवारांना संधी दिली होती. या सर्व जणी विजयी झाल्या होत्या.
आपने निवडणुकपूर्व प्रचारात महिलांसाठी मोफत बस सेवा, महिला सुरक्षा आदी मुद्दे मांडले होते. मात्र, निवडणुकीत विजयी झाल्यानंतर एकाही महिलेला मंत्रिमंडळात स्थान न दिल्याचे चित्र दिसत आहे.
कल्काजी येथून निवडून आलेल्या आतिशी यांनी याआधी आप नेते आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या महत्त्वाच्या सल्लागार म्हणून काम केले होते. त्यांनी सरकारी शाळांमधील शैक्षणिक धोरणाविषयी महत्वाचे बदल करून दर्जा सुधारण्यात योगदान दिले. राखी बिर्ला यांनाही एकूण ७४ हजार १०० मतांसह ३० हजार मतांच्या फरकाने निवडणूक जिंकून आणि ५८ टक्के मते मिळवूनही मंत्रिमंडळात स्थान मिळालेले नाही.
आज मुख्यमंत्री केजरीवाल यांनी रामलीला मैदानात दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांच्यानंतर मनीष सिसोदिया, सत्येंदर जैन, गोपाल राय, कैलाश गेहलोत, इम्रान हुसेन आणि राजेंद्र गौतमास यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. ७० जागांच्या दिल्ली विधानसभेत 'आप'ला ६२ जागांसह स्पष्ट बहुमत मिळाले.