नवी दिल्ली - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील महिलांना डीटीसी बस आणि मेट्रोतून मोफत प्रवासाची सुविधा देणार असल्याची घोषणा केली आहे. शनिवारी रात्री दिल्लीतील लोधी कॉलनीत भेट दिली असता केजरीवालांनी ही घोषणा केली. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केजरीवालांचा हा निर्णय महत्वपूर्ण मानला जात आहे.
महिलांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेतला असल्याचे केजरीवाल यांनी सांगितले. महिलांनी सार्वजनीक वाहतुकीचा जास्तीत जास्त वापर करावा यासाठी जनजागृती करण्याचा उद्देश समोर ठेवून महिलांना डीटीसी बस आणि मेट्रोतून मोफत प्रवासाची सुविधा देणार असल्याचे ते म्हणाले. यासाठी येणारा सर्व खर्च दिल्ली राज्य सरकार उचलणार असल्याचे ते म्हणाले.
येत्या काही महिन्यांत दिल्ली विधानसभेच्या निवडणूका होऊ घातल्या आहेत. केजरीवालांनी त्यासाठीच ही खेळी खेळल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. केजरीवालांच्या या उपक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी दरवर्षी १२०० कोटींचा बोजा सरकारवर पडणार आहे. हा माझा पैसा नसून दिल्लीतील जनतेचाच पैसा असल्याचे ते म्हणाले. यासाठी आम्ही कोणताही अतिरिक्त कर लादलेला नसून केवळ भ्रष्टाचार रोखून आम्ही हा पैसा वाचवला आहे. तोच पैसा आम्ही आता जनतेसाठी वापरत असून जनतेने आम्हाला आशिर्वाद द्यावेत, असे आवाहन त्यांनी केले आहे. केजरीवालांची ही मोफत प्रवासाची खेळी कितपत यशस्वी ठरते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.