नवी दिल्ली - उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरून सुरू असलेल्या आंदोलनाने हिंसक वळण घेतले आहे. आंदोलकांनी दगडफेक केल्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज करून त्यांना पांगवले. यावेळी आंदोलकांनी वाहनांना आग लावली आहे.
उत्तर प्रदेशमधील काही जिल्ह्यांमध्ये कलम 144 लागू करण्यात आले असूनही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात हिंसाचार सुरु आहे. शहरामधील खदरा भागामध्ये दगडफेक झाली असून आंदोलकांनी मदेयगंज आणि सतखंडा पोलीस चौकी पेटवून दिली आहे. तसेच पोलिसांच्या वाहनांना आग लावली आहे. काही आंदोलकांनी माध्यमांची वाहनेदेखील पेटवून दिली आहेत.
हेही वाचा - CAA Protest Live: संचारबंदी असूनही अनेक ठिकाणी हिंसक आंदोलन; नेते आणि महत्त्वाच्या व्यक्तींची धरपकड
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी डीजीपी ओम प्रकाश सिंह आणि मुख्य सचिव गृह अवनीश कुमार अवस्थी यांना परिस्थिती नियंत्रित ठेवण्याचे निर्देश दिले होते. मात्र तरीही लखनौमध्ये हिंसेच्या घटना समोर येत आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव काही मेट्रो स्टेशन्सही बंद ठेवण्यात आली आहेत.