नवी दिल्ली - महान वैज्ञानिक अल्बर्ट आइन्स्टाईन यांच्या विधानावरून राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. अज्ञानापेक्षा धोकादायक गोष्ट म्हणजे अहंकार, असे आईनस्टाईन यांनी म्हटले होते. देशातील लॉकडाऊनने हे सिद्ध केले आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटलं.
यापूर्वीही राहुल गांधी यांनी देशातील लॉकडाउन विफल ठरल्याचे म्हटलं होतं. देशात वारंवार लॉकडाउन लागू केले जात आहेत. मात्र, त्याचा सकारात्मक परिणाम होताना दिसत नाही. उलट करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतेच आहे, असे राहुल गांधी यांनी एका ग्राफद्वारे दाखवून देण्याचा प्रयत्न केला होता.
कोरोनामुळे देशात लॉकडाऊन केल्याने देशाची आर्थिक पिछेहाट झाली आहे. अर्थव्यवस्था कमकुवत झाली असून सरकारकडून अर्थव्यवस्था सावरण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. वेळोवेळी राहुल गांधी यांनी सरकारला अर्थव्यवस्थेच्या स्थितीवरून इशारा दिला आहे.
देशात 3 लाख 32 हजार 424 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यात 1 लाख 53 हजार 106 अॅक्टिव्ह केसेस आहेत. तर, 1 लाख 69 हजार 798 जण बरे झाले आहेत. तर, 9 हजार 520 जणांचा बळी गेल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. यात महाराष्ट्र, तामिळनाडू आणि दिल्लीमध्ये सर्वांत जास्त कोरोनाबाधित आढळले आहेत.