श्रीनगर - जम्मू काश्मीर पोलीस आणि लष्कराने गुप्त माहितीच्या आधारे जम्मू काश्मीर गझनवी फोर्स या दहशतवादी संघटनेच्या सदस्याला अटक केली. त्याच्याकडील गाडीतून स्फोटके सदृश्य सामान जप्त करण्यात आले आहे. राजौरी जिल्ह्यातील गलूठी येथे ही कारवाई केली. सुरक्षा दलांच्या कारवाईमुळे दहशतवाद्यांच्या हालचालीबाबत आणखी माहिती मिळण्याची शक्यता सुरक्षा दलांनी व्यक्त केली आहे.
स्थानिक दहशतवाद्यांचा सहभाह उघड होण्यास मदत -
अमली पदार्थ, हत्यारे आणि दारुगोळा साठवणुकीत स्थानिक दहशतवाद्यांचा सहभाग उघड होण्यास सुरक्षा दलांना मदत होणार आहे. दहशतवाद्याला ताब्यात घेतल्यानंतरही शोध मोहिम सुरूच ठेवण्यात आली आहे. दहशतवाद्यांचे गुप्त स्थळे आणि दारुगोळा आणखी कोठे ठेवला आहे का? याचा शोध सुरक्षा दले घेत आहेत.
राजौरी जिल्ह्यात स्फोट घडवून आणण्याच होता प्रयत्न-
राजौरी जिल्ह्यात बॉम्बस्फोट घडवण्याचा डाव दहशतवाद्यांचा होता. याद्वारे जिल्ह्यातील शांतता धोक्यात आणण्याचा प्रयत्न दहशतवादी करत असल्याचा अंदाज सुरक्षा दलांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, पुंछ जिल्ह्यातील डोगरायन भागात १३ डिसेंबरला गझनवी फोर्स या दहशतवादी संघटनेच्या दोन दहशतवाद्यांना जम्मू काश्मीर पोलीस आणि सुरक्षा दलांनी कारवाईत ठार मारले होते. या दहशतवाद्यांचे पाकिस्तानशी संबंध असल्याचे तपासात उघड झाले होते. जम्मू काश्मीर गझनवी फोर्सने मागील काही दिवसांत काश्मिरात कारवाया वाढवल्या आहेत. त्यामुळे सुरक्षा दले सतर्क झाली आहेत.