नवी दिल्ली - लडाख सीमा वादावरून काँग्रेस नेते राहुल गांधी केंद्र सरकारवर वारंवार टीका करत आहेत. त्यांनी याबाबतची गोपनीय माहिती खुली करावी, असे म्हटले आहे. याविषयी ते सोशल मीडियावरून वारंवार सरकारला प्रश्न विचारत आहेत. यावर सेवानिवृत्त लष्करी अधिकाऱ्यांच्या एका समूहाने राहुल गांधींच्या या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली आहे.
राहुल गांधी यांनी यापूर्वीही पाकिस्तानविषयी केलेल्या वक्तव्याचा पाकिस्तान सरकार आणि त्यांच्या लष्कराने आंतरराष्ट्रीय पातळीवर वापर केला होता. त्यामुळे राष्ट्रविरोधी कारवायांना बळच मिळाले होते. आता राहुल गांधी पुन्हा ती चूक करत आहेत, असे माझी लष्करी अधिकार्यांचे म्हणणे आहे. या अधिकाऱ्यांमध्ये माझी एअर व्हाईस मार्शल संजीब बॉर्दोलोई, एअर कमोडोर पी.सी ग्रोवर तसेच ब्रिगेडियर दिनकर यांचा यामध्ये समावेश आहे.
तुमच्या राजकारणासाठी भारतीय लष्कराच्या गोपनीय बाबी आणि त्यांचे महत्व यासंबंधी आक्षेपार्ह वक्तव्ये करणे चुकीचे आहे. अशा प्रकारांमुळे लष्कराच्या मनोबलाचे खच्चीकरण होते, असे दिनकर अदीब म्हणाले.
एका अधिकाऱ्याने 1962 मधील चीन सोबतच्या युद्धाविषयी बोलताना सांगितले की, या युद्धाचे नेतृत्व पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केले होते. त्यावेळी सैन्य तयारी न करता रणांगणात उतरले होते. चीनकडून आपल्याला हार पत्करावी लागली. मात्र, भारतीय लष्कराने बहादुरी दाखवली होती. त्यांच्या कित्येक सैनिकांचा खात्मा केला होता. राहुल गांधी यांच्या सध्याच्या वक्तव्याविषयी त्यांनी नाराजी व्यक्त केली. राहुल गांधी यांना समजायला हवे की, जगातील सर्वात दुर्गम भागात आपले लष्कर काम करत आहे, असे ते म्हणाले.
लडाख सीमेवरील घटनांवरून बुधवारी राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीका केली होती. चीनचे सैनिक भारतीय सीमेवर दाखल झाले आहेत. मात्र, आपले पंतप्रधान गप्प आहेत. ते सध्या कुठे दिसत नाहीत, असे ट्विट करून राहुल गांधी म्हणाले होते. त्यांच्या या प्रकारच्या वक्तव्यांवरून वाद सुरू झाला आहे.