अमरावती - अनेक दिवसांपासून लागू असलेला लॉकडाऊन आता अनलॉक व्हायला सुरुवात झाली आहे. अनलॉक 1.0 मध्ये आंध्रप्रदेश सरकार कोरोनाचा जास्त फैलाव झालेल्या राज्यांतील प्रवाशांवरून सावध पवित्रा घेत आहे. या राज्यातून येणाऱ्या प्रवाशांबाबत जास्त सतर्क राहण्याचे आदेश राज्य सरकारने अधिकाऱ्यांना दिले आहेत.
कोरोनाचा कमी प्रसार झालेल्या राज्यांतून येणाऱ्या प्रवाशांना होम क्वारंटाईन होण्याचे आदेश देण्यात येणार आहेत. तर अती फैलाव झालेल्या राज्यातील प्रवाशांना इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन म्हणजेच सरकार निर्देशित ठिकाणी ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे पोलीस महासंचालक डी. जी. सवांग यांनी सांगितले. त्यानंतर कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर प्रवाशाला रुग्णालयात भरती करण्यात येईल. आणि जर कोरोना चाचणी निगेटिव्ह आली तर त्यानंतर आणखी 7 दिवस घरीच विलगीकरणात राहण्याचे सांगण्यात येईल, असेही ते म्हणाले.
महाराष्ट्र, तामिळनाडू, गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश आणि दिल्लीमध्ये कोरोनाचा जास्त फैलाव झाला आहे. त्यामुळे या राज्यातून येणाऱ्या प्रवाशांबाबत राज्य सरकार जास्त काळजी घेणार असल्याचे दिसून येत आहे. मात्र, यातही 60 वर्षांपेक्षा जास्त वयाचे नागरिक, गर्भवती महिला आणि 10 वर्षांपेक्षा लहान मुले यांना घरी क्वारंटाईन होण्याचे सांगण्यात येणार आहे.
खासगी वाहनाने येणाऱ्यांना पास अनिवार्य
खासगी वाहनाने राज्यात येणाऱ्या नागरिकांना सरकारी स्पंदना वेब पोर्टलवरून ई-पास घ्यावा लागणार आहे. तसेच वैद्यकीय तपासणीही करून घ्यावी लागणार आहे. तसेच शेजारील तेलंगाणा राज्यातून येणाऱ्या प्रवाशांची रँडम टेस्ट घेण्यात येणार आहे.