डेहराडून - पंतप्रधान मोदींनी सुरू केलेल्या स्वच्छ भारत अभियानाने प्रेरित होऊन, शहरातील विहार आणि सुदूरवर्ती कॉलनीतील रहिवाशांनी आसपासचा परिसर 'प्लास्टिक-मुक्त' करण्याचा विडा उचलला आहे. सरकारी मदत न घेता येथील रहिवासी आपल्या घरातील कचरा आणि प्लास्टिक यांचे विभाजन करून त्यांचा सदुपयोग करून घेत आहेत.
कॉलनीमधील रहिवाशांनी आपल्या घरीच ओला आणि सुखा कचरा वेगळा करून त्यापासून सेंद्रिय खत (कंपोस्ट खत) तयार केले आहे. जमा केलेला प्लास्टिकचा कचरा इंडियन पेट्रोलीयम येथे डिझेल बनवण्यासाठीही पाठवत आहेत. विहार कॉलनीला झीरो वेस्ट झोनचा पुरस्कार देखील मिळाला आहे. कॉलनीमधील महिलांनी घरातील टाकाऊ बेडशीट आणि पडद्यापासून 1 हजार 500 बॅग बनवल्या आहेत. या बॅग परिसरातील दुकानदार आणि भाजी विक्रेत्यांना दिल्या आहेत.
गेल्या एका वर्षांपासून घरातील ओला आणि सुखा कचरा वेगळा करून त्यापासून खत तयार केले आहे. कचऱ्यांचे विभाजन केल्यामुळे परिसर प्लास्टिक-मुक्त झाला आहे, असे रहिवासी आशीष गर्ग यांनी सांगितले. सरकार आणि अधिकाऱ्यांवर आरोप करण्यापेक्षा प्रत्येक नागरिकाने देशाला स्वच्छ बनवण्याची जबाबदारी घेतली पाहिजे, असेही गर्ग म्हणाले.