बंगळुरू - 'पाकिस्तान जिंदाबाद' अशा देशविरोधी घोषणा देणाऱ्या एका व्यक्तीला कर्नाटकमधून अटक करण्यात आली आहे. राज्याच्या उडपी जिल्ह्यातील कुंदापुरा गावात ही घटना घडली.
राघवेंद्र गणिगा (वय - ४३) असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. ते हिंदीचे प्राध्यापक म्हणून एका खासगी महाविद्यालयात नोकरी करत होते. सध्या ते मानसिक रूग्ण आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.
राघवेंद्र यांना एक पत्नी आणि एक मुलगा आहे, मात्र ते वेगळे राहत होते. राघवेंद्र यांना मोठ्या प्रमाणात टीव्ही पाहण्याची सवय होती, आणि टीव्हीवरील देशद्रोहाची प्रकरणे पाहूनच ते सध्या असे वागत असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून समजली आहे.
आज सकाळी राघवेंद्र यांना रूग्णालयात तपासणीसाठी नेण्यात आले होते. मात्र, त्यांच्या कक्षामधून पळ काढत ते रूग्णालयाच्या आवारात या देशविरोधी घोषणा देत होते, जिथून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. याप्रकरणी अधिक चौकशी सुरू आहे.
दरम्यान, बंगळुरूमध्येही काही ठिकाणी भिंतींवर 'स्वतंत्र काश्मीर' असे लिहिलेले आढळून आले. तसेच, पंतप्रधान मोदींविषयी आक्षेपार्ह मजकूर, आणि 'मोदी राजीनामा द्या' असा मजकूर आढळून आला आहे. हे कोणी केले याबाबत माहिती मिळाली नसून पोलीस तपास सुरू आहे.
हेही वाचा : कोरोना विषाणू : देशात आढळले दोन नवीन रुग्ण..