नवी दिल्ली - सैन्यदलातील एक सैनिक आपल्या पत्नीला मिळवण्यासाठी पोलीस ठाण्यात खेटे घालत आहे. गाजियाबादमधील सिहानी गेट परिसरातील एक सैनिक आणि पोलीस दलात कार्यरत असलेली त्याची पत्नी गेल्या काही दिवसांपासून वेगळे राहात आहेत. या लग्नामुळे तिच्या माहेरचे लोक खुश नाहीत, त्यामुळे तिला ते सासरी येऊ देत नाहीत, असा आरोप या सैनिकाने केला आहे. आपल्याला आपली पत्नी परत मिळावी, अशी मागणी या सैनिकाने पोलिसांकडे केली आहे.
या दोघांचे 9 वर्षांपूर्वी लग्न झाले आहे. पत्नी बुलंदशहरची आहे असून सध्या तिची पोस्टिंग गाजियाबादला आहे. तर, सैनिक पती हरियाणाचा आहे. पत्नीच्या माहेरचे या लग्नामुळे समाधानी नाहीत. त्यामुळे ते आपल्या पत्नीला आपल्या विरोधात फूस लावत आहेत. मला माझी दोन मुले व पत्नी परत मिळवून द्यावीत, अशी विनंती या सैनिकाने पोलिसांना केली आहे. मात्र, पोलीस असलेल्या पत्नीनेही पतीवर काही आरोप केले आहेत.
सिहानी गेट पोलिसांनी अद्याप दोन्ही बाजूची तक्रार दाखल करून घेतलेली नाही. हे प्रकरण महिला पोलीस ठाण्याच्या अखत्यारित येत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यामुळे हे प्रकरण त्यांच्याकडेच दिले जाईल.
पोलीस अधीक्षकांनाही मदतीसाठी घालणार साकडे -
न्याय मिळाला नाही तर, मी हे प्रकरण पोलीस अधीक्षकांकडे घेऊन जाईन. कुठल्याही परिस्थितीत मुले आणि पत्नीला घरी आणायचे आहे, असे या सैनिकाचे म्हणणे आहे.