अमरावती - ४ मे पासून लागू झालेल्या लॉकडाऊनमध्ये काही निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. त्यानंतर सर्वच राज्यांनी दारुची दुकाने सुरू केली आहेत. मात्र, प्रमाणापेक्षा जास्त गर्दी होत असल्याने राज्य सरकारांनी दारुवरील कर आणि किंमतीही वाढविण्यास सुरुवात केली आहे. दिल्ली सरकारने दारु विक्रीवर ७० कोरोना अधिभार लावल्यानंतर आता आंध्रप्रदेश सरकारे दारुच्या किंमतीत ७५ टक्क्यांनी वाढ केली आहे. यामुळे राज्य सरकारांचा महसूलही वाढत आहे.
याआधी २५ टक्के किंमती वाढविण्यात आल्या होत्या. मात्र, आज पुन्हा ५० टक्के त्यात वाढ करण्यात आली आहे. किंमत वाढविल्यानंतर नागरिक दारु खरेदी करण्यापासून परावृत्त होतील, त्यामुळे त्यांचे आरोग्यही सुरक्षित राहील, असे महसूल विभागातील मुख्य सचिव रजत भार्गव यांनी सांगितले. नवे दर तत्काळ लागू होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
सुरुवातीला ११ वाजेपासून दारुची दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली होती. मात्र, आता दुपारी १२ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत विक्री करण्यास परवानगी असेल. नव्या दर वाढीमुळे राज्याच्या महसुलात ९ हजार कोटी वाढणार असल्याचे सरकारी सुत्रांनी सांगितले. त्यामुळे राज्यातील रिकामी झालेली तिजोरीही भरण्यास मदत होणार आहे. आंध्रप्रदेश राज्यामध्ये दारु विक्री राज्य सरकारकडे असून एकूण ३ हजार ४६८ सरकार नियंत्रतीत दुकाने आहेत.