अमरावती (आंध्र प्रदेश) - मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांनी तीन राजधान्या निश्चित करण्याचे ठरवले आहे. मात्र, त्यांच्या या निर्णयाला आंध्र प्रदेशच्या जनतेचा पाठिंबा नसल्याची टीका तेलुगु देसम पार्टीचे(टीडीपी) राष्ट्रीय अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांनी केली आहे. राजधानी संदर्भात नव्याने ठराव घेतल्यास जनमत फिरेल की काय, अशी भीती जगनमोहन यांना वाटत आहे, असेही चंद्राबाबू म्हणाले.
विधानसभा बरखास्त करून पुन्हा निवडणुका घ्याव्यात, अशी टीडीपीची मागणी आहे. मात्र, सत्ताधारी पक्ष टीडीपीचे आव्हान स्वीकारण्यास तयार नाही. अमरावतीत राजधानी स्थापन करण्यासाठी १३ हजार गाव आणि ३ हजार महापालिका प्रभागातील नागरिकांनी आपापल्या प्रदेशातून माती आणि पाणीही आणले आहे, असा दावा चंद्राबाबू यांनी केला आहे.
फक्त अमरावतीच राज्याची राजधानी असावी या मागणीसाठी १८ डिसेंबर २०१८पासून आंदोलन सुरू झाले आहे. या आंदोलनात आतापर्यंत ८५ पेक्षा जास्त शेतकरी, शेतमजूर, महिला व कामगारांचा मृत्यू झाला आहे. तरीही जगनमोहन सरकार आपल्या तीन राजधान्यांच्या निर्णयावर अडून आहे. पोलिसांनी अनेक आंदोलकांना विनाकारण तुरूंगात डांबले असून अनेकवेळा लाठीमारही केला आहे, असे चंद्राबाबू यांनी सांगितले.
दरम्यान, सत्ताधाऱयांनी वारंवार राजधानीचे स्थलांतर केले तर यात राज्याचे मोठ्या प्रमाणात नुकसानच होते. जगनमोहन यांना आंदोलकांचा आक्रोश समजायला हवा मात्र, ते त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. असे टीडीपीचे राष्ट्रीय सरचिटणीस नारा लोकेश यांनी म्हटले.