अमरावती – आपल्याला कोरोना झाला आहे या संशयातून आंध्र प्रदेशमध्ये एका व्यक्तीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. राज्याच्या गुंतुर जिल्ह्यामध्ये राहणाऱ्या या व्यक्तीने स्वतःला गळफास लावून घेत आपले जीवन संपवले.
अक्काला व्यंकटय्या (५५) असे या व्यक्तीचे नाव आहे. गुंतुरमधील कोटापल्ली गावाचा तो रहिवासी होता. तो हैदराबादवरून आपल्या गावी परत आला होता. आपल्यामुळे आपल्या संपूर्ण गावाला कोरोनाचा संसर्ग होईल, अशी भीती त्याच्या मनात होती. या विचारातूनच त्याने हे टोकाचे पाऊल उचलले.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी काही स्वयंसेवकांनी हैदराबादवरुन गावात आलेल्या व्यक्तींची नावे लिहून घेतली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सातच्या सुमारास व्यंकटय्याने आपल्या मुलाला फोन करून आपल्याला कोरोना झाला असल्याचा संशय व्यक्त केला. तसेच, आपल्यामुळे संपूर्ण गावाला याची लागण होण्याची भीतीही त्याने व्यक्त केली.
मुलाला म्हटला, माझा मृतदेह लांबूनच बघ..
शनिवारी सकाळी मुलाला फोन करून आपल्याला कोरोना असेल अशी भीती व्यंकटय्याने व्यक्त केली. याचवेळी त्याने असेही सांगितले, की माझ्या मृतदेहाला तू लांबूनच बघ. आपल्यामुले आपल्या मुलालाही कोरोना होईल, या भीतीने व्यंकटय्याने तसे सांगितले होते.
यानंतर त्याचा मुलगा तातडीने त्याला शोधण्यासाठी घराबाहेर पडला. मात्र, तोपर्यंत फार उशीर झाला होता.
हेही वाचा : धक्कादायक..! कर्नाटकातील कोरोना संशयित रुग्णाने केली आत्महत्या