चेन्नई - तामिळनाडूमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १९ जून ते ३० जून, असे १२ दिवसांचे लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर कोरोना संक्रमित असलेल्या चार जिल्ह्यातील गरजूंना ३० जूनपर्यंत अम्मा कँटीनद्वारे मोफत जेवणाचे वाटप करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री के. पलानीस्वामी यांनी जाहीर केले आहे. याआधीदेखील अम्मा कँटीनमार्फत गरजूंना जेवणाचे वाटप करण्यात आले होते.
तामिळनाडूमधील चेन्नई, तिरुवल्लूर, कांचीपुरम आणि चेंगलपेट या चार जिल्ह्यात कोरोना विषाणूने मोठे थैमान घातले आहे. या जिल्ह्यामंध्ये ५० हजाराहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यात १९ जून ते ३० जूनपर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. या १२ दिवसीय लॉकडाऊनदरम्यान फक्त दूध आणि आरोग्य सेवेशी निगडीत सुविधांमध्ये सुट देण्यात आली आहे.
गुरुवारी याबाबत माहिती देताना राज्याचे मुख्यमंत्री के. पलानीस्वामी यांनी कोरोना संक्रमित असलेल्या चारही जिल्ह्यांना शुक्रवारपासून पुढील १२ दिवसापर्यंत मोफत अन्नपुरवठा करणार असल्याचे सांगितले. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी येथील कम्युनिटी किचनच्या माध्यमातून जेवणाचा पुरवठा करण्यात येणार आहे. तर, या जिल्ह्यातील वयोवृद्ध असलेल्या नागरिकांना घरपोच जेवण पोहोचवण्याची सोयदेखील करण्यात येणार असल्याचे त्यांनी जारी केलेल्या पत्रकाद्वारे सांगितले.
दरम्यान, कम्युनिटी किचनच्या माध्यमातून गरजू नागरिकांसाठी मोफत जेवणाची सोय करत आहे. या कार्यप्रणालीला आणखी वाढवण्यात येणार आहे. तर, वयोवृद्ध नागरिकांना घरपोच अन्न पोहोचवण्यात येणार आहे, असेही ते म्हणाले. ही व्यवस्था ३० जूनपर्यंत राहील, असेही मुख्यमंत्री पलानीस्वामी यांनी सांगितले.