पणजी - गोव्यातील पर्यटन व्यवसाय वाढविणे आणि बंद खाण व्यवसाय सुरू करण्यासाठी भाजप शक्य ते सर्व प्रयत्न करेल. पर्रिकर-मोदी ही जोडगोळीच गोव्याचा विकास अधिक गतीने पुढे नेऊ शकते. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत गोव्याच्या दोन्ही जागांवर भाजपला विजयी करा, असे आवाहन भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी आज गोव्यातील जनतेला केले.
गोवा प्रदेश भाजपच्यावतीने आज बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या अँथलेटीक स्टेडियमवर अटल बुथ कार्यकर्ता मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला होता. व्यासपीठावर केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक, खासदार नरेंद्र सावईकर, प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर, गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर, सभापती डॉ. प्रमोद सावंत आणि गोवा सरकारमधील मंत्री उपस्थित होते.
राहुलबाबा-मौनीबाबा, शाह यांनी उडवली खिल्ली-
शाह पुढे म्हणाले, काँग्रेस गोव्याला केवळ पाच हजार कोटी रुपये द्यायचे. मात्र, सत्तेत आल्यानंतर भाजपने साडेचार वर्षांत ५ हजार कोटींचा निधी दिला आहे. त्यामुळे काँग्रेस अध्यक्ष आमच्याकडे कसला हिशोब मागता, असा सवाल करत त्यांनी गांधीवरही निशाणा साधला. पर्रिकर-मोदी जोडीने गोव्याचा विकास केला. २०१४ मध्ये केंद्रात भाजप सत्तेवर आल्यानंतर भारतीय सेनेचे आधुनिकीकरण करण्यात आले. तत्पूर्वी मौनीबाबा मनमोहन सिंग- सोनिया सरकार काळात दहशतवादी कधीही येत असत. मोदींच्या आदेशाने भारतीय लष्कराने पाकिस्तानमध्ये घूसून सर्जिकल स्ट्राइक केल्यानंतर हे प्रकार थांबले. त्यापूर्वी स्वतःच्या सैनिकांचा बदला घेणारे अमेरिका आणि इस्राएल हे दोनच देश असल्याचे सांगत काँग्रेसवर टीकास्त्र सोडले.
महाआघाडीच्या सत्तेत देश रविवारी सुट्टीवर जाईल-
भाजप सरकारने गोव्यात सर्वाधिक गुंतवणूक केली. केंद्र सरकारचा विकास सांगायचा असेल तर ७ दिवसांचा एक भागवत सप्ताह करावा लागेल, असे सांगून शाह म्हणाले की, एका बाजूला नरेंद्र मोदी तर दुसऱ्या बाजूला महाआघाडी आहे. ज्यांचा नेता नाही. ते सत्तेत आले तर सोमवारी मायावती, मंगळवारी अखिलेश, बुधवारी देवेगौडा, गुरू चंद्राबाबू, शुक्रवारी स्टँलिन, शनिवारी शरद पवार असे पंतप्रधान असतील आणि रविवारी देश सुट्टीवर जाईल. त्यामुळे ही महाआघाडी देशाला पुढे नेऊ शकत नसल्याचाही टोला शहांनी लगावला.
नुकत्याच पार पडलेल्या गोवा विधानसभा अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची भेट घेतली होती. त्यानंतर राफेल वरुन केंद्र सरकारला लक्ष केले. त्याला पर्रिकर यांनी प्रत्युत्तर दिले. याचा आधार घेत राहुल गांधीवर टीका करत शाह म्हणाले, राहुल गांधी यांनी राजकारणाची पातळी खाली नेली परंतु, पर्रिकर यांनी ताठपणे पत्र लिहुन ' आर' अक्षर येणारा कोणताही शब्द उच्चारला नसल्याचे सांगितले. भाजप सत्तेवर आल्यानंतर दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी कायदा आणणार आहे. काँग्रेस अध्यक्षांनी हा कायदा हवा की नको ते सांगावे, असा सवालही त्यांनी केला.
मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर काही काळासाठी व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यकर्त्यांशी बोलताना त्यांनी आपण आज मोठ भाषण न करता निवडणुकीसाठी राखून ठेवत असल्याचे सांगून त्यांनी व्यासपीठावरून निरोप घेतला. त्या अनुषंगाने बोलताना शाह म्हणाले, गोव्याचे मुख्यमंत्री आजाराशी लढत आहेत. काँग्रेस मात्र त्याचेही राजकारण करत असल्याची टीका केली. भाजपच्या या सभेसाठी आजी-माजी मंत्री, पक्ष पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.