नवी दिल्ली - भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांचा नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता आहे. गृह किंवा अर्थखात्याच्या पदाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवली जाईल, अशी चर्चा आहे. त्यातच गुजरातचे भाजप प्रदेशाध्यक्ष जितू वाघानी यांनी ट्विटरवरून अमित शहांना शुभेच्छा दिल्याने या शक्यतेत भर पडली आहे.
नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते, तेव्हा त्यांच्या मंत्रिमंडळात गृहमंत्रीपद अमित शाहांकडे होते. २०१० साली झालेल्या सोहराबुद्दीन बनावट एन्काउंटर प्रकरणी त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर अमित शाहांनी कोणत्याही मंत्रिमंडळात सहभाग घेतला नाही. त्यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून काम पाहिले. ते राज्यसभचेही सदस्यही होते. मात्र, आता लोकसभा निवडणूक लढवून ते लोकसभेचे सदस्य बनले आहेत. त्यांची नेमणूक आता थेट केंद्रीय गृहमंत्रीपदी किंवा अर्थमंत्री होणार असल्याची चर्चा आहे. आजच्या शपथविधी सोहळ्यात त्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यास यावर शिक्कामोर्तब होईल.
मोदींच्या मंत्रिमंडळात यावेळी खांदेपालट होण्याची शक्यता आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी प्रकृती अस्वास्थतेच्या कारणाने मंत्रिमंडळात सहभागी होणार नसल्याचे कळवले आहे. त्यामुळे अर्थ खात्याचा कारभार अमित शाहांकडे सोपवला जाऊ शकतो.