नवी दिल्ली - नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्यात अनेक खांत्यामध्ये खांदेपालट होण्याची शक्यता आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांचाही या मंत्रिमंडळात सहभाग होण्याची सूत्रांची माहिती असून गृहमंत्री पदाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवली जाणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे देशाला आगामी काळात नवीन गृहमंत्री मिळण्याची शक्यता आहे.
नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते, तेव्हा त्यांच्या मंत्रिमंडळात गृहमंत्रीपद अमित शाहांकडे होते. २०१० साली झालेल्या सोहराबुद्दीन बनावट एन्काउंटर प्रकरणी त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर अमित शाहांनी कोणत्याही मंत्रिमंडळात सहभाग घेतला नाही. त्यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून काम पाहिले. ते राज्यसभचेही सदस्य होते. मात्र, आता लोकसभा निवडणूक लढवून ते लोकसभेचे सदस्य बनले आहेत. त्यांची नेमणूक आता थेट केंद्रीय गृहमंत्रीपदी होणार असल्याची चर्चा आहे. उद्याच्या शपथविधी सोहळ्यात त्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यास यावर शिक्कामोर्तब होईल.
भाजपच्या कार्यप्रणालीत लालकृष्ण अडवाणी यांच्या व्यतिरिक्त एकाही व्यक्तीची दोनदा भाजपच्या अध्यक्षपदी नियुक्त करण्यात आली नव्हती. तसा अलिखित नियमच भाजपमध्ये तयार झाला होता. मात्र, २०१४ च्या निवडणुकीनंतर यात पुन्हा यात बदल करून ही मर्यादा वाढवून दोनदा करण्यात आली. त्यामुळे शहांची दुसऱ्यांदा भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. त्यांचा दुसरा कार्यकाळही आता संपुष्टात आला आहे. त्यामुळे शाहांची आता पक्षाच्या अध्यक्षपदी निवड न करता मंत्रिमंडळात समावेश करण्याची शक्यता आहे.
मोदींच्या मंत्रिमंडळात यावेळी अनेक खांदेपालट होण्याची शक्यता आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी प्रकृती अस्वस्थतेच्या कारणाने मंत्रिमंडळात सहभागी होणार नसल्याचे कळवले आहे. त्यामुळे अर्थ खात्याचा कारभार कोणाकडे सोपवला जातो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. शिवाय अमित शहांची गृहमंत्रीपदी निवड झाल्यास राजनाथ सिंहांवर कोणती जबाबदारी सोपवली जाणार याकडेही सर्वांचे लक्ष लागून आहे.