नवी दिल्ली - नरेंद्र मोदी सरकारने महिलांना कामाच्या ठिकाणी लैंगिक छळापासून संरक्षण मिळावे यासाठी 2018 मध्ये स्थापन केलेल्या समितीचे बुधवारी पुर्नगठन केले आहे.या समितीचे अध्यक्ष अमित शाह असणार आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयाने ही माहिती दिली आहे.
यामध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारमन, मानव संसाधन विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक आणि महिला व बाल विकासमंत्री स्मृती इराणी यांचा समावेश आहे. लोकसभा निवडणुकांनतर नवीन समितीचे गठन करण्यात आले आहे.
2018 मध्ये '#मी टू' मोहिमवेळी मोदी सरकारने महिलांना कामाच्या ठिकाणी लैंगिक छळापासून संरक्षण मिळावे यासाठी मंत्र्याची एक समिती स्थापन केली होती. लैंगिक छळवणूक सारख्या अपराधावर कडक कारवाई आणि यासंबधीत कठोर कायदे करण्यासाठी सूचना देणे हे या समितीचे काम आहे. याचबरोबर महिलांच्या कामच्या ठिकाणी योग्य वातावरण निर्माण करण्यासाठी या समितीची स्थापना करण्यात आली आहे.
'#मी टू' ही कोणत्याही क्षेत्रांत, कार्यालयीन वातावरणात अथवा कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक अत्याचाराविरोधात प्रथम ट्विटरद्वारे #मीटू असा हॅशटॅग वापरून, आवाज उठवण्यासाठी सुरू झालेली मोहीम आहे