अमेठी - राहुल गांधींच्या उमेदवारी अर्जाच्या वैधतेबाबतच्या प्रकरणावर आज सुनावणी झाली. यामध्ये राहुल गांधींचे वकील के. सी. कौशिक यांनी राहुल यांच्यावर लावले गेलेले आरोप खोटे असल्याचे सांगितले. त्यांचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर राहुल गांधी यांचा उमेदवारी अर्ज वैध असल्याचा निर्णय देण्यात आला.
राहुल गांधींच्या वकिलांनी केलेल्या युक्तीवादात ते म्हणाले, आम्ही निवडणूक अधिकाऱ्यांसमोर साक्ष दिली आहे. याचबरोबर त्यांच्या नागरिकतेवरून असेलेल्या आरोपांवरून आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना अधिकृत माहिती दिली आहे. प्राप्तिकर विभागाच्या प्रश्नांवर के. सी. कौशिक यांनी सांगितले की, नियमानुसार २०१९ पूर्वीच्या ५ वर्षांच्या मिळकतीबाबत माहिती सादर करावी लागते. ती आम्ही सादर केली आहे.
राहुल गांधींच्या नागरिकेतबाबतच्या मुद्द्यावर कौशिक म्हणाले की, राहुल गांधींचा जन्म भारतात झाला आहे. आतापर्यंत ते भारताचा पारपत्र (पासपोर्ट) बाळगत आहेत. त्यांनी इतर दुसऱ्या कुठल्याच देशाचे नागरिकत्व स्वीकारले नाही. आम्ही दिलेल्या माहितीनुसार राहुल गांधींनी १९९५ साली एम.फील. ची परीक्षा उत्तीर्ण केली होती. त्यासंबंधीचे सर्व दस्ताऐवज आमच्याकडे उपलब्ध आहेत. ते आम्ही न्यायालयात सादर करू शकतो.
अपक्ष उमेदवार ध्रुवपाल कौशक यांनी राहुल गांधींच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेतला होता. त्यांनी राहुल गांधींनी उमेदवारी अर्जावर चुकीची माहिती दिल्याचा आरोप केला होता. ध्रुवपाल यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना याबाबतची चौकशी करण्याची मागणी केली होती. मात्र, निवडणूक अधिकाऱ्यांनी या चौकशीला २२ एप्रिलपर्यंत स्थगिती दिली होती.