नवी दिल्ली - दुप्पट भाडे वसूल करून एका कुटुंबाला जम्मू-काश्मीरला नेल्याचा आरोप असलेल्या एका रुग्णवाहिका चालकाला लक्ष्मी नगर भागात दिल्ली पोलिसांनी अटक केली. आरोपी विरेंद्र लुथरा याला पोलिसांनी चेक पॉईंटवर वाहने तपासताना अटक केली.
चेक पॉईंटवर वाहने तपासताना पोलिसांना रुग्णवाहिकेत ७ जण आढळले. ते सर्वजण एकाच कुटुंबातील असून जम्मू-काश्मीरला जात असल्याची माहिती पोलीस चौकशीत समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हे कुटुंब त्यांच्या एका नातेवाईकाला घेऊन एम्समध्ये उपचारासाठी आले होते. मात्र, अचानक लॉकडाऊन लागल्याने ते दिल्लीत अडकून पडले होते. यादरम्यान, ते आरोपी विरेंद्र लुथराला भेटले. त्याने प्रतीव्यक्ती १० रुपयांऐवजी २० रुपये प्रतिकिलोमीटरची मागणी केली आणि जम्मू-काश्मीरला जायला तयार झाला. याप्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.