भोपाळ (मध्य प्रदेश) - वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभा आणि विधानसभेत असलेले राजकीय आरक्षण रद्द करण्याची मागणी केली आहे. या राजकीय आरक्षणाची तरतुद अनुसुचित जाती आणि अनुसुचित जमातींच्या प्रगती करता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत फक्त पहिल्या १० वर्षांसाठीच केली होती. सद्या याचा वापर व्होटबँक बनविण्यासाठी भारतातील पक्ष करत आहेत, असेही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले.
मध्य प्रदेशमधील २५ विधानसभेच्या रिक्त जागेची निवडणूक होणार आहे. त्यासंदर्भात तयारी करण्यासाठी ते भोपाळ येथे आले होते. यावेळी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले, की आरक्षणा संदर्भात सद्या देशात गैरसमजाचे वातावरण आहे. डॉ. आंबेडकरांनी घटनेत राजकीय आरक्षणाची तरतुद फक्त पहिल्या १० वर्षासाठी केली होती. तसेच डॉ. बाबासाहेबांनी १९५४ मध्ये म्हटले होते, की या तरतुदीचा फायदा जर या दोन गटातील व्यक्तीला मिळत असेल, तर ते कालांतराने बंद करावे. आज त्यांचे उद्दिष्ट साध्य झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे सद्या राजकीय आरक्षणाची गरज संपली असून सरकारने ते लवकरात लवकर बंद करावे. परंतू काँग्रेस असो अथवा भाजप त्यांना हे राजकीय आरक्षण संपू द्यायाचे नाही कारण त्यांना त्यांची व्होट बँक गमावण्याची भीती आहे.
सार्वजनिक क्षेत्रातील नोकरी आणि शिक्षणातील आरक्षणाची तरतुद घटनेतील १६ व्या कलमात करण्यात आली आहे. तो अनुसुचित जाती आणि अनुसुचित जमाती यांचा मुलभूत अधिकार आहे. याचा लाभ आपोआप गरिबातील गरीब असणाऱ्यांना मिळत आहे. मध्य प्रदेशातील विधानसभेच्या रिक्त असलेल्या २५ जागेवरील निवडणूक वंचित बहुजन आघाडी लढवणार असल्याचेही ते या वेळी म्हणाले.