नवी दिल्ली - केंद्र सरकारने १७ व्या लोकसभेचे अधिवेशन सुरू होण्यापूर्वी सर्वपक्षीय बैठक पार पडली. बैठकीला नरेंद्र मोदींसह सर्व पक्षाचे नेत्यांनी हजेरी लावली होती.
बैठक संपल्यानंतर प्रल्हाद जोशींनी पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले, की आम्ही बैठकीत सहभागी झालेल्या सर्व पक्षांच्या नेत्यांबरोबर संवाद साधला. यावेळी आम्ही त्यांच्याकडून कामकाजाबाबत मते मागितली आहेत. सरकार त्यांच्या मतांवर विचार करुन काम करेल. यासोबतच नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली भाजपच्या संसदीय दलाच्या कार्यसमितीची बैठक पार पडली. यामध्ये पक्षाच्या रणनितीवर चर्चा करण्यात आली.
लोकसभेत भाजपकडे ५४३ पैकी ३५३ जागा आहेत. परंतु, राज्यसभेत २४५ पैकी १०२ सदस्य आहेत. त्यामुळे, विरोधकांच्या सहमतीशिवाय संसदेत विधेयक संमत होवू शकत नाही. यामुळे, संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी आणि मंत्र्यांनी सोनिया गांधी आणि गुलाम नबी आझाद यांच्यासह अनेक नेत्यांशी चर्चा करुन संसदेत सहयोग करण्याचे आव्हान केले होते.
सरकारला संसदेत यावेळी तिहेरी तलाक, केंद्रीय शैक्षणिक संस्था (शिक्षकांचे आरक्षण) आणि आधार यासोबत अन्य महत्वाचे विधेयके मंजूर करायची आहेत. लोकसभेचे पहिले सत्र उद्या १७ जूनला सुरू होणार आहे. तर, अर्थ सर्वेक्षण ४ जुलै तर, ५ जूनला अर्थसंकल्प सादर होणार आहे.