लखनौ - केंद्रीय गुन्हे अन्वेषण (सीबीआय) न्यायालयाने दिलेल्या बाबरी मशीद निकालाविरोधात अखिल भारतीय मुस्लीम वैयक्तिक कायदा मंडळाने उच्च न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे. वैयक्तिक कायदा मंडळाच्या महत्त्वपूर्ण बैठकीत बाबरी विध्वंस प्रकरणातील सीबीआय न्यायालयाच्या निर्णयाला एकमताने उच्च न्यायालयात आव्हान देण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
मंडळाच्या कार्यकारी समितीच्या सदस्यांची रविवारी महत्त्वपूर्ण बैठक झाली असून यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. सीबीआय न्यायालयाने 30 सप्टेंबर रोजी दिलेल्या बाबरी मशीद प्रकरणी निकालात सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे.
हेही वाचा - देशातील कोरोना रुग्णांनी ओलांडला 70 लाखांचा टप्पा; तर 1 लाख मृत्यू
मंडळाचे अध्यक्ष मौलाना राबे हसानी नदवी यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडिओ कॉन्फरन्सिंग बैठक सलग ४ तास चालली. या बैठकीत बाबरी विध्वंस प्रकरणातील सीबीआय न्यायालयाच्या निर्णयाचा तीव्र निषेध करण्यात आला आणि हा अन्याय असल्याचे म्हटले गेले. कार्यकारी समितीच्या बैठकीस महासचिव मौलाना वली रहमानी, सचिव जफरयाब जिलानी आणि सदस्य असदुद्दीन ओवैसी यांच्यासह अनेक लोक उपस्थित होते. सुत्रांच्या माहितीनुसार पुढील आठवड्याभरातच बाबरी मशीद निकालाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली जाण्याची शक्यता आहे.