जयपूर - कोरोना व्हायरसच्या (विषाणू) संसर्गामुळे चीनमध्ये मृत्यूचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाचा धोका लक्षात घेता राजस्थान सराकारने राज्यात अलर्ट जारी केला आहे. चीनमधून राजस्थानमध्ये आलेल्या तब्बल 18 लोकांना वैद्यकीय देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.
संबधित प्रवाशांना येत्या 28 दिवसांकरीता वैद्यकीय देखरेखीखाली ठेवले आहे. तसेच बाहेरून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी करण्यात येत आहे. दरम्यान शनिवारी आरोग्य मंत्रालयाकडून परिपत्रक जारी करण्यात आले आहे. मंत्रालयाने हे पत्रक जारी करून चीनला जाणाऱ्या प्रवाशांना सतर्कतेचा इशारा दिला असून काही सूचना केल्या आहेत.
दिल्लीसह मुंबई, चेन्नई, बंगळुरू, हैदराबाद, कोच्ची आणि कोलकाताच्या विमानतळांवर थर्मल स्क्रिंनिंगची व्यवस्था करण्यात आली आहे. चीन आणि हाँगकाँगहून परतलेल्या प्रवाशांची थर्मल स्क्रिनिंग करण्यात येत असल्याची माहिती आहे. आतापर्यंत या विषाणूमुळे चीनमध्ये ५६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १ हजार ९७० नागरिकांना या व्हायरसची लागण झाली आहे. प्रतिबंधक उपाय म्हणून देशाच्या अनेक प्रांतातील वाहतूक सेवा बंद करण्यात आली आहे. सर्वात जास्त रुग्ण चीनमधील हुबेई प्रांतात सापडले आहेत.
काय आहे कोरोना व्हायरस ?
कोरोना विषाणुमुळे व्यक्तीला श्वसननलिकेचा संसर्ग होतो. ताप, खोकला, श्वास घेण्यास त्रास होता. यावर कोणतेही प्रभावी औषध उपलब्ध नाही.