रांची (झारखंड) - आजच्या धावपळीच्या जगात फास्टफूड हा लोकांच्या आहारातील एक भाग बनला आहे. वेळेची कमतरता आणि व्यस्तता यामुळे अनेकजण वेळेची बचत म्हणून फास्टफूडचा पर्याय निवडतात. मात्र, घरापासून दूर राहणाऱ्या प्रत्येकालाच घरच्या जेवणाची चव हवी असते. हाच विचार करून रांचीमध्ये अजम एम्बा रेस्टॉरंट सुरू करण्यात आले.
अजम एम्बा' हा शब्द झारखंडमधील उरांव आदिवासी समाजाच्या कुडूख भाषेतून घेण्यात आला आहे. याचा अर्थ रुचकर आणि चविष्ट जेवण असा होतो. या ठिकाणी आदिवासींच्या परंपरागत पद्धतीनुसार तयार जेवणाची चव चाखायला मिळते.
अजम एम्बामध्ये जेवायला येणाऱ्या ग्राहकांचे स्वागतही आदिवासी परंपरेनुसार केले जाते. पाहुण्यांप्रमाणे ग्राहकांच्या हातावर पाणी टाकून हात धुऊन दिले जातात त्यानंतर, चटईवर बसवून घरासारखे जेवणं वाढले जाते. विशेष म्हणजे, उखळात कुटलेल्या तांदळापासून तयार केलेला भात आणि पाट्यावर बारीक केलेल्या मसाल्यांपासून तयार भाजीची चव येथे चाखायला मिळते. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे, सर्व जेवण चुलीवर तयार केले जाते. या सर्व प्रक्रियेला जरा वेळ लागत असतो त्यामुळे, येथील जेवणाला 'स्लो फूड'ही म्हटले जाते. मात्र, पारंपारिक पद्धतीने बनवलेल्या या अस्सल गावातल्या चवदार जेवणाचा आनंद काही औरच असतो. सोबतच येथील जेवण पत्रावळ, मातीची भांडी आणि कांस्याच्या भांड्यातून वाढले जाते त्यामुळे, जेवणाचा आनंदही द्विगुणीत होतो.
आदिवासी संस्कृती आणि परंपरा निसर्गाशी जुळलेली आहे. हिच ओळख शहरवासीयांना तसेच विदेशी पर्यटकांना करून देण्याचे काम रांचीतील अजम एम्बा रेस्टॉरंटच्या माध्यमातून केल जात आहे. येथे विविध ठिकाणाहून लोकं येतात. आदिवासी पद्धतीने तयार केलेल्या जेवणाचा आनंद घेतात आणि पाहुणचाराच्या या आगळ्यावेगळ्या शैलीने भारावून जातात. आपणही कधी रांचीत आलाच तर इथे एकदा भेट द्यायला हरकत नाही.