नवी दिल्ली - रविवारी पहाटे कोझिकोड विमान अपघातात मृत्यू पावलेल्या सह-वैमानिक अखिलेश कुमार यांचा मृतदेह दिल्लीला आणण्यात आला. यावेळी विमानतळावर सुमारे दोनशे पायलट आणि विविध एअरलाइन्सचे कर्मचारी एकत्र आले आणि त्यांनी अखिलेश यांना आदरांजली वाहिली.
शुक्रवारी रात्री केरळमधील कोझिकोड विमानतळावर एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानाला अपघात झाला. यामध्ये मुख्य वैमानिक कॅप्टन दीपक वसंत साठे (वय 58) आणि सह वैमानिक कॅप्टन अखिलेशकुमार (वय 32) यांचा मृत्यू झाला यासह विमानातील आणखी 16 लोकांचा मृत्यू झाला.
रविवारी पहाटे दोनच्या सुमारास इंडिगो विमानाने अखिलेश यांचे पार्थिव कोची येथून दिल्ली विमानतळावर आणण्यात आले. यावेळी इंडिगो स्पाइस जेट एअर इंडिया एअर इंडिया एक्स्प्रेस सारख्या विविध एअरलाईन्सचे सुमारे दोनशे पायलट आणि ग्राउंड स्टाफ सदस्य विमानतळावर जमले आणि त्यांनी अखिलेश यांना आदरांजली वाहिली.
यानंतर अखिलेश कुमार यांचा मृतदेह उत्तर प्रदेशातील मथुरा येथे रस्ते-मार्गाने नेण्यात आला येथे त्यांचे कुटुंबीय राहतात.
एअर इंडियाचे विमान दुबईहून 190 जणांसह कोझिकोडला पोहोचले होते. विमानतळावर लँडिंगदरम्यान ते 35 फूट खोल दरीत पडले आणि त्याचे दोन तुकडे झाले. या अपघातात एकूण 18 जणांचा मृत्यू झाला.