नवी दिल्ली - धूर आणि धुक्याने दिल्ली शहराला मागील काही दिवसांपासून पांघरुण घातले आहे. हवेचा दर्जा 'अतिशय खराब' स्तरावर आला असून हवामान विभागाने नागरिकांना सकाळी फेरफटका मारण्यास आणि घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे.
खराब हवेमुळे अनेक नागरिकांना श्वसनाचे आणि डोळ्याशी संबधित त्रास सुरू झाले आहेत. आज (गुरूवारी) सकाळी ८.३० वाजता हवेचा दर्जा (एअर क्वालिटी इंडेक्स) ३१२ अंकावर आला आहे. ० ते ५० पर्यंत चांगली हवा, ५१ ते १०० समाधानकारक, १०१ ते २०० मध्यम, २००ते ३०० - खराब, ३०१ ते ४०० - अतिशय खराब आणि ५०० निर्देशांकाच्या पुढे हवेची पातळी अतिशय वाईट असते.
मागील ३ दिवसांपासून हवेची पातळी खूप खालावली आहे. त्यामुळे श्वास गुदमरल्यासारखे होत आहे. सगळीकडे धुरकट वातावरण आहे. सकाळी मास्क घालून बाहेर पडावे लागेल. हवेची पातळी सुधारण्यासाठी सरकारने काहतरी करावं, असे रविंद्र कुमार या स्थानिक नागरिकाने सांगितले.
धुलिकणांमुळे श्वास घेता येत नाही. हिवाळ्यामध्ये हवेचा दर्जा आणखी खालावेल, असे राम कुमार या नागरिकाने सांगितले. सद्य स्थितीत शहरात किमान तापमान २० अंशसेल्सिअस असून कमाल तापमान ३३ सेल्सिअस आहे.