नवी दिल्ली : लॉकडाऊनमुळे होत असलेल्या नुकसानाला आळा घालण्यासाठी एअर इंडियाने आणखी एक पाऊल उचलले आहे. पाच युरोपीय देशांमध्ये सुरू असलेली एअर इंडियाची विमान सेवा थांबवण्यात आली आहे. या देशांमधून अपेक्षित तितक्या प्रमाणात प्रवासी मिळत नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
मद्रिद, मिलान, कोपेनहॅगन, व्हिएन्ना आणि स्टॉकहोम या देशांमधील एअर इंडियाची सेवा तातडीने थांबवण्यात आली आहे. या मार्गांवर अपेक्षित अशी प्रवासी संख्या नसल्यामुळे, कंपनीला नुकसान होत आहे. त्यामुळे हा निर्णय घेतल्याचे एअर इंडियाच्या प्रवक्त्याने सांगितले.
वंदे भारत मोहिमेंतर्गत आधीच भारताने युरोपातील ठराविक ठिकाणीच विमानसेवा सुरू ठेवल्या आहेत. यापुढे जशी मागणी वाढेल, तसे आम्ही पुन्हा तेथील सेवा सुरू करु, असेही त्यांनी स्पष्ट केले. गेल्या महिन्यात एअर इंडियाने दिल्ली ते पॅरिस या मार्गावर आठवड्यातून तीन, आणि दिल्ली ते फ्रँकफ्रूट मार्गावर आठवड्यातून चार विमाने सुरू केल्याचे जाहीर केले होते.
जुलैमध्ये आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटनेने (आयएटीए) असे जाहीर केले होते, की जागतिक प्रवासी विमान वाहतूक सेवा ही कोरोनापूर्व काळात होती त्याप्रमाणे होण्यासाठी २०२४पर्यंत वाट पहावी लागेल.