नवी दिल्ली – एअर इंडिया एक्सप्रेसच्या अपघातानंतर मदतीला धावून जाणाऱ्या केरळातील मल्लपूरम येथील नागरिकांचे कंपनीने आभार मानले आहेत. स्थानिकांनी मानवता आणि दयाळूपणा दाखविल्याचे एअर इंडिया एक्सप्रेसने म्हटले आहे.
एअर इंडिया एक्सप्रेसने ट्विट करत मल्लपूरमच्या नागरिकांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. ट्विट्मध्ये म्हटले, की आम्ही मानवतेला वंदन करतो! केरळमधील मल्लपूरमच्या लोकांना ह्रदयापासून वंदन! त्यांनी अचानक घडलेल्या अपघातात दयाळूपणा आणि मानवतेचा आमच्यावर वर्षाव केला. तुमचे आमच्यावर खूप उपकार आहेत.
आयुष्य वाचविण्यासाठी केवळ धाडस नाही, तर मानवतेला स्पर्श करावा लागतो. ज्यांनी जीव धोक्यात घालून अनेकांचे प्राण वाचविले आहेत, त्यांना आम्ही एअर इंडिया एक्सप्रेस वंदन करत आहोत, असे ट्विटमध्ये म्हटले आहे.
मदतकार्यातील सर्वजण क्वारंटाइन -
कोझीकोड विमानतळावर शुक्रवारी झालेल्या अपघातात एअर इंडिया एक्सप्रेसमधील 18 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 100 जण जखमी झाले आहेत. या अपघातात मदतकार्यासाठी पीपीई कीटसह इतर सुविधा नसताना 135 स्थानिक आणि 42 पोलिसांनी सहभाग घेत मदतकार्य केले. मृतामधील दोन जणांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळले आहे. त्यामुळे मदतकार्यातील सर्वांना क्वारंटाइन करण्यात आले आहे.