नवी दिल्ली - जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठामध्ये गोळीबार झाल्यानंतर एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. 'सरकारला काहीच लाज राहीली नसून हे मुलांवर अत्याचार करत आहेत. तसेच मुलींनाही मारहाण केली जात आहे', असे ओवेसी म्हणाले.
'जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाच्या गेट नंबर 5 जवळ गोळीबार झाल्याची घटनेचा असदुद्दीन ओवेसी यांनी निषेध केला. मी जामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांसोबत आहे. ही सरकार मुलांवर आत्याचार करत आहे. तेथील एका विद्यार्थ्यांला डोळ्याला इजा झाली असून तो आता त्या डोळ्याने पाहू शकत नाही. मुलींनाही मारहाण केली जात असून या सरकारला काहीच लाज राहिली नाही', असे ओवेसी म्हणाले.
जामिया-मिलिया इस्लामिया विद्यापीठाच्या गेट नंबर 5 जवळ रविवारी गोळीबार झाल्याची घटना घडली होती. दरम्यान, 30 जानेवारीला देखील जामिया विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या मोर्चादरम्यान गोळीबार झाल्याची घटना घडली होती. सीएए आणि एनआरसी विरोधात दिल्लीच्या राजघाटपासून विद्यापीठापर्यंत विद्यार्थ्यांचा मोर्चा सुरू असताना यावेळी एका तरुणाने गोळीबार केला होता. यात एक विद्यार्थी जखमी देखील झाला होता.