अहमदाबाद - अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प उद्या भारताच्या दौऱ्यावर येत आहेत. अहमदाबादमधील जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमचे उद्धाटन ट्रम्प यांच्या हस्ते होणार आहे. मात्र, सर्व तयारी सुरू असतानाच मैदानातील तीन नंबर गेट अचानक कोसळले. कोसळलेले लोखंडी गेट उद्धाटन कार्यक्रमासाठी तात्पुरत्या स्वरुपात बांधण्यात आले होते.
या दुर्घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. मात्र, ट्रम्प येण्याच्या एक दिवस आधीच दुर्घटना झाल्यामुळे याची चर्चा सुरू आहे. भव्य अशा मोटेरा स्टेडियममध्ये ट्रम्प यांच्या जंगी स्वागतची तयारी सुरू आहे. स्टेडियमपासून साबरमती आश्रमापर्यंत रोड शोचेही आयोजन करण्यात आले आहे.
ट्रम्प यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने अहमदाबद शहरामध्ये महापालिकेने अनेक कामे युद्धपातळीवर केली. झोपडपट्टी दिसू नये म्हणून भिंत उभी करण्यात आली आहे. रस्त्यांच्या डागडूजीसह नवे फुटपाथ बसवण्यात आली आहेत. मोदी ट्रम्प यांचा ताफा ज्या रस्त्याने जाणार आहे, त्या रस्त्यावरील पानटपऱ्या सील करण्यात आल्या आहेत. मोदी- ट्रम्प तसेच अमेरिका भारत मैत्रीचे अनेक पोस्टर शहरामध्ये लावण्यात आले आहेत.