पुणे - आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये २८८ पैकी २४० जागांवर सहमती झाली आहे. पुढील काही दिवसांत उमेदवारांची यादी तयार होईल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (रविवारी) पुणे येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे.
पवार म्हणाले, 'निवडणुकीत ईव्हीएमचा वापर होणार असल्यामुळे मनसेप्रमुख राज ठाकरे निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याच्या तयारीत आहेत. परंतु, मनसेने निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय आम्हाला मान्य नाही. देशातील अनेक पक्ष ईव्हीएमविरोधात आहेत. हा मुद्दा न्यायालयात प्रलंबित आहे. परंतु, अजूनही निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याच्या निर्णयावर कोणताही पक्ष पोहचला नाही. राज ठाकरे यांनी सोनिया गांधीची भेट घेतली आहे. अनेक मनसे नेत्यांसोबत भेट झाली आहे. मनसेचे नेते ईव्हीएमविरोधात आहेत आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत येण्यास इच्छुक आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्यात २४० जागांवर करार झाला असल्यामुळे उर्वरित ४८ जागांसाठी स्वाभिमानी आणि इतर पक्षांसोबत चर्चा सुरू आहे.'
भाजप सत्तेचा गैरवापर करत आहे - शरद पवार
पक्षातील नेते भाजप-सेनेत प्रवेश घेण्याबद्दल शरद पवार देवेंद्र फडणवीसांवर टीका करताना म्हणाले, सत्ताधारी भाजप-सेना सत्तेचा गैरवापर करत आहेत. नेत्यांना ईडी, आयकर विभाग, सीबीआय आणि एसीबीच्या चौकशीला सामोरे जाण्याच्या धमक्या देऊन पक्षात प्रवेश करण्यासाठी भाग पाडले जात आहेत. भाजप नेते कर्नाटक, मध्यप्रदेश आणि राजस्थानमध्येही दुसऱ्या पक्षातील नेत्यांना चौकशीची धमकी देऊन पक्षात प्रवेश करण्यास भाग पाडत आहेत.