जयपूर – कोरोनाच्या महामारीत भाजपचे काही खासदार हे प्रतिकारक्षमता वाढविण्याच्या अजब सल्ल्याने चर्चेत आले आहेत. यामध्ये राजस्थानमधील खासदार सुखबीर सिंह जौनापुरिया यांची भर पडली आहे. शंख वाजवा, चिखलात बसा आणि फळांच्या पानांचा रस घ्या हा प्रतिकारक्षमता वाढविण्याचा अजब सल्ला खासदार जौनापुरिया यांनी दिला आहे. चिखलात बसलेला व्हिडिओही त्यांनी फेसबुकवर पोस्ट केला आहे.
खासदार सुखबीर सिंह जौनापुरिया हे टोंक-सवाई मधोपूर मतदारसंघाचे भाजपचे खासदार आहेत. त्यांनी चिखलात बसून शंख वाजवित असलेला व्हिडिओ फेसबुकवर पोस्ट केला आहे. ते व्हिडिओमध्ये म्हणतात, जर तुमचे फुफ्फुस आणि मूत्रपिंड हे व्यवस्थित चालत असेल तर शंख वाजविणे ही खूप मोठी गोष्ट आहे. मी सुमारे 2 मिनिटापर्यंत शंख वाजवू शकतो. यापूर्वी 10 ते 20 सेकंदाहून अधिक वेळ शंख वाजवू शकत नव्हतो. त्यांनी कच्ची भेंडी, मिरची आणि विविध झाडांची पाने खाल्ली आहेत.
यापुढे ते म्हणाले, की तुम्हाला औषधांपासून प्रतिकारक्षमता मिळत नाही. तुम्हाला केवळ निसर्गापासून प्रतिकारक्षमता मिळते. तुम्ही बाहेर गेले पाहिजे. पावसात जावे. चिखलात बसावे. सायकल चालवावी. शंख वाजवावा. भारतीय अन्न खावे. प्रतिकारक्षमता वाढविण्यासाठी औषधे खाण्याची गरज नाही. तुम्ही औषध खाणे सुरू ठेवले तर मी तुम्हाला थांबविणार नाही, असेही सांगायला खासदार विसरले नाहीत. मात्र, त्यापूर्वीच त्यांनी औषधे ही प्रतिकारक्षमता वाढवित नाही, असा दावा केला.
यापूर्वी खासदार सुखबीर सिंह जौनापुरिया यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाला 21 जूनला गोलाकार आगीभोवती बसलेला व्हिडिओ प्रसिद्ध केला होता. त्यामध्ये योगामध्ये असलेली अग्नी साधना ते करत होते. ते चांगल्या आरोग्यासाठी आणि प्रतिकारक्षमता वाढविण्यासाठी नैसर्गिक उत्पादने वापरण्याचा आग्रह करतात.
यापूर्वी केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी कोरोनाच्या लढ्यात प्रतिकारक्षमता वाढविण्यासाठी पापड खाण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. पश्चिम बंगालचे खासदार दिलीप घोष यांनी प्रतिकारक्षमता वाढविण्यासाठी गोमूत्राचा वापर करण्याचा सल्ला दिला होता. दरम्यान, भाजपच्या खासदारांनी केलेले दावे अजून वैज्ञानिकदृष्टीने सिद्ध झालेले नाहीत. जगभरातील संशोधक हे कोरोनाच्या लढ्यात मानवाची प्रतिकारक्षमता वाढविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र, अजूनही 100 टक्के यश मिळाले नाही.