लखनऊ - गुंड विकास दुबे याच्या विरोधात तक्रार दाखल केल्यानंतर 14 दिवस बेपत्ता असलेल्या राहुल तिवारी या व्यक्तीचा सुगावा पोलिसांना लागला आहे. तिवारी याने विकास दुबे विरोधात संपत्तीच्या वादातून तक्रार दाखल केली होती. त्यानंतर 2 जुलैच्या रात्री पोलीस दुबेच्या घरी छापा टाकण्यास गेले होते. यावेळी झालेल्या चकमकीत 8 पोलीस ठार झाले तर 7 जण जखमी झाले होते.
'राहुल तिवारी याने दुबे विरोधात तक्रार दाखल केली होती. याशिवाय तो या प्रकरणातील मुख्य साक्षीदार आहे, असे पोलीस महासंचालक(कायदा सुव्यवस्था) प्रशांत कुमार यांनी म्हटले आहे. संपत्तीच्या वादातून तिवारीने विकास दुबे विरोधात 30 जूनला पोलिसांत तक्रार दाखल केली होती. मात्र, त्यानंतर गुंड दुबेने तिवारीला घरी बोलवून बेदम मारहाण केली होती. या घटनेनंतर पोलीस दुबेला अटक करण्यासाठी बिकारु गावात गेले होते.
2 जुलैच्या रात्री पोलीस विकास दुबेला अटक करण्यासाठी घरी गेले असताना त्याने साथीदारांच्या मदतीने पोलिसांवर गोळीबार केला. यांमध्ये पोलीस उपअधीक्षकासह 8 पोलीस ठार झाले. त्यानंतर विकास दुबे फरार झाला होता. मध्यप्रदेशातली उज्जैन येथील महाकाल मंदिरातून त्याला ताब्यात घेण्यात आले होते. मात्र, कानपूरजवळ पोलिसांच्या वाहनाचा अपघात झाल्यानंतर दुबेने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, यावेळी पोलिसांच्या गोळीबारात तो ठार झाला. या चकमकीवरही प्रश्नचिन्ह उभे राहिले असून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे.