इंदूर (मध्य प्रदेश) - जवळपास पाच वर्षांपूर्वी पाकिस्तानमधून भारतात परतलेली मूकबधीर तरुणी गीता आपल्या कुटुंबाच्या शोधात आहे. डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला गीताने महाराष्ट्र आणि तेलंगाणामध्ये येत आपल्या कुटुंबाचा शोध घेतला, मात्र यादरम्यान गीताच्या कुटुंबाचा शोध लागला नाही. त्यानंतर आज तेलंगाणामधील एक कुटुंब हे इंदूर येथे गीताला भेटण्यासाठी गेले आहे. गीता ही आमची मुलगी असल्याचा दावा या कुटुंबाने केला आहे. तसेच या कुटुंबाने काही फोटो आणि कागदपत्रांचा हवाला देत गीता आमची मुलगी असल्याचा दावा केला आहे. मात्र, गीताने हे सर्व फोटो बघितल्यावर हे माझे कुटुंब नसल्याचे सांगितले आहे.
काय आहे प्रकरण -
गीता सध्या ३० वर्षे वयाची असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. ती बालपणी चुकीने रेल्वेगाडीत बसून सुमारे २० वर्षांपूर्वी पाकिस्तानमध्ये गेली होती. पाकिस्तानी रेंजर्सला ती लाहोर रेल्वे स्थानकावर समझोता एक्स्प्रेसमध्ये बसलेली आढळली होती. देशाच्या तत्कालीन परराष्ट्रमंत्री दिवंगत सुषमा स्वराज यांच्या विशेष प्रयत्नांमुळे ती 26 ऑक्टोबर 2015 रोजी भारतात परत आली होती. त्यानंतर ती इंदूरमधील स्वयंसेवी संस्थेत वास्तव्य करत आहे व आपल्या कुटुंबीयांचा शोध घेत देशाच्या विविध भागात फिरत आहे.
गीता मुलगी असल्याचा नाशकातील कुटुंबाचा दावा
पाकिस्तानातून परतलेली मूकबधीर गीता आपल्या कुटुंबाचा शोध घेण्यासाठी नाशिकला आली होती. नाशिकच्या एकलहरा भागात राहणाऱ्या रमेश सोळसे यांनी गीता आपली मुलगी असल्याचा दावा केला होता. मात्र, गीताने दावा करणाऱ्या आई-वडिलांना ओळखले नसल्याने पुन्हा एकदा गीताच्या पदरी निराशा पडली आहे.
पाकिस्तानातून परतलेली गीता आमची मुलगी असल्याचा देशातील चाळीस कुटुंबांचा दावा
पाकिस्तानातून आलेली मूकबधीर गीता ही आमची मुलगी आहे, म्हणून देशातून चाळीस कुटुंबाने दावे केले आहेत. यात महाराष्ट्रातून तीन कुटुंबांनीं दावे केले असल्याचे आनंद सर्व्हिस संस्था यांनी सांगितले आहे.
गीता ही आमची मुलगी आहे असा दावा देशातील महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, दिल्ली, तेलंगाणा, बिहार, झारखंड या राज्यातील चाळीस कुटुंबांनीं केला आहे. या कुटुंबांपर्यंत गीताला घेऊन जाण्यासाठी इंदूरमधील आनंद सर्व्हिस संस्था मदत करत आहे.
गीताचे हावभाव आणि इशाऱयावरून तिच्या कुटुंबाचा घेतला जातोय शोध
अधिकाऱयांनी सांगितले की, गीताच्या नाकाला उजवीकडे छिद्र केले आहे. त्यानुसार मूकबधीर महिलांच्या मते तिच्या मूळ गावाजवळ ऊस, तांदूळ आणि शेंगदाण्याचे पीक घेतले जात असावीत. दरम्यान, गीता ही तेलुगू चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेता महेश बाबूची प्रशंसक आहे. गीताच्या हावभावानुसार तिच्या घरात इडली, डोसासारखे दक्षिण भारतीय पदार्थ बनवले जातात.
तसेच लहानपणीच्या पुसट आठवणींद्वारे गीताने आपल्या गावाजवळ एक रेल्वे स्थानक आणि गावातील नदीच्या किनाऱ्यावर एक मंदिर असल्याचे सांगितले आहे. त्यानुसार गीताला नांदेड, परभणी आणि जालना जिल्ह्यातील रेल्वे स्थानक असणाऱ्या परिसरात आणले होते. यानंतर तेलंगाणाच्या सीमाभागात गीताच्या कुटुंबाचा शोध घेण्यात आला. मात्र, तरीही गीताच्या कुटुंबाचा शोध लागला नाही.
महाराष्ट्र पोलीस मदतीला -
गीताचे कुटुंब शोधण्यासाठी महाराष्ट्र पोलीसही मदतीला आले आहेत. औरंगाबादमधील वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण पाटील यांनी सांगितले की, मागील 20 वर्षापासून मराठवाडा परिसरातून हरवलेल्या मूकबधीर मुलींचा रेकोर्ड तपासण्यात येत आहे. यामुळे गीताच्या कुटुंबांना शोधण्यासाठी मदत होईल, असे किरण पाटील यांनी सांगितले आहे. तसेच महाराष्ट्रातीन ज्या भागात गीताने पाहणी केली त्या भागातील पोलीस गीताच्या कुटुंबाचा शोध घेण्यासाठी मदत करत आहेत.
कुटुंब शोधण्यासाठी गीताने केला महाराष्ट्र आणि तेलंगाणाचा दौरा
कुटुंबा शोधण्यासाठी गीताने डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला महाराष्ट्रातील मराठवाड्यामधील औरंगाबाद, जालना, नांदेड, नाशिक, परभणी, धरमाबाद आणि तेलंगाणाच्या बासर येथे दौरा करण्यात आला होता. त्यानंतर गीता पुन्हा इंदूरला परतली होती.