लखनौ - प्रियंका गांधी अनेक दिवसांपासून उत्तर प्रदेश दौऱ्यावर आहेत. नुकतीच त्यांनी गंगा यात्रा केली. यादरम्यान त्यांनी अनेक लोकांशी संपर्क साधला. आता प्रियंका रेल्वे यात्रा करत राज्यात संपर्क अभियान राबवणार आहेत. प्रियंका गांधी २७ मार्चला दिल्ली ते फैजाबाद रेल्वेयात्रा करणार आहेत. यावेळी त्या सर्व मतदारसंघातील लोकांशी संवाद साधतील. अयोध्येमध्ये प्रियंका 'रोड शो' करणार आहेत.
प्रियंका गांधींकडे उत्तर प्रदेशच्या पूर्व भागाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. काँग्रेसच्या महासचिवपदाची जबाबदारी स्वीकारल्यापासून प्रियंका उत्तर प्रदेशात जोमाने कामाला लागल्या आहेत. प्रचार मोहिमेदरम्यान प्रियंकांनी अनेक मंदिरांना भेटी दिल्या. गंगा नदीची पूजा करत प्रियंकांनी आपल्या प्रचार मोहिमेला सुरुवात केली होती.
अशी असणार प्रियंकांची ट्रेन यात्रा -
प्रियंका अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. प्रियंका दिल्लीहून कैफियत एक्सप्रेसने फैजाबादला येतील. त्या साडेपाचच्या सुमारास फैजाबादला पोहोचतील. यानंतर त्या सकाळी अयोध्येत रोड शो करतील. ५० किलोमीटर असणारा हा रोड शो कुमारगंजमध्ये समाप्त होईल, अशी माहिती उत्तर प्रदेश काँग्रेस समितीचे सचिव राजेंद्र प्रताप सिंह यांनी दिली.
योगींना करताहेत लक्ष्य -
उत्तर प्रदेश दौऱ्यादरम्यान प्रियंका सातत्याने योगी सरकारवर हल्लाबोल करताना दिसत आहेत. पंतप्रधान मोदींच्या समर्थनाची अपील करणाऱ्या टी-शर्टचे मार्केटिंग करण्याऐवजी शिक्षामित्रांच्या अडचणी सोडवण्यावर भर द्यावा, अशा शब्दांत प्रियंका गांधींनी योगी सरकारवर टीका केली. शिक्षामित्रांच्या मेहनतीचा दररोज अपमान होतो. यातील अनेकांनी आत्महत्या केली आहे. जे रस्त्यावर उतरले त्यांच्यावर सरकारने लाठीहल्ला केला, असेही प्रियंका म्हणाल्या. अंगणवाडी कर्मचाऱ्यांवरुनही प्रियंकांनी योगी सरकारला अनेकदा धारेवर धरले.
प्रियंकांमुळे भाजपला नुकसान होणार?
प्रियंका गांधींच्या सक्रिय राजकीय प्रवेशानंतर उत्तर प्रदेशात भाजपला नुकसान होईल, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. प्रियंकांचा जनसामान्यांतील वावर, महिलांविषयक मुद्यांना भाषणातून मांडणे आदी बाबींमुळे प्रियंका युपीतील सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्यात बऱ्यापैकी यशस्वी होताना दिसत असल्याचेही राजकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे.