जयपूर - सध्या कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी संपूर्ण देशातील डॉक्टरांसह आरोग्य सेवक-सेविका, पोलीस हे युद्धपातळीवर काम करत आहेत. यातच जैसलमेरच्या जवाहर चिकित्सालयातील चिकित्सक आणि इतर आरोग्य कर्मचारी हे कोरोनाबाधितांसाठी झटत आहेत. तर, दुसरीकडे इतर भरती असलेले रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांचे लॉक डाऊन दरम्यान हाल होऊ नये यासाठी डॉक्टर आणि इतर आरोग्य कर्मचाऱ्यांचा समूह हे सर्व त्यांच्या ड्यूटीनंतर रुग्णालयातील इतर रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी जेवण बनवण्याकरता मदत करताहेत. तर, आरोग्य विभागाच्या या दुसऱ्या रुपाचे दर्शन झाल्याने रुग्णांसह त्यांचे नातेवाईकही भारावून गेले आहेत.
![चपात्या बनवताना वैद्यकीय अधिकारी](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/6667282_thumbnai.png)
![अन्न वाटप करताना वैद्यकीय कर्मचारी](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/6667282_pir.jpg)
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २२ मार्चला जनता कर्फ्यू आणि त्यानंतर देशभरात लॉक डाऊन करण्यात आले. यामुळे जवाहर रुग्णालयात अन्न पुरवठा करणाऱ्या एका ट्रस्टचे काम ठप्प झाले. त्यामुळे या रुग्णाल्यात भरती असलेल्या रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांपुढे अन्नासाठी अडचणी यायला लागल्या. यावर येथील संवदेनशील डॉक्टर आणि त्यांच्या स्टाफने काही पैसे गोळा करून 'जन रसोई'ची सुरुवात केली. त्यांच्या या उपक्रमाला आणखी काही जणांनी हातभार लावला आणि त्याद्वारे येथे सकाळच्या नाश्त्यापासून तर रात्रीच्या जेवणापर्यंतची व्यवस्था करण्यात आली आहे. येथे दरदिवशी ९० ते १०० जणांसाठी जेवणाची व्यवस्था केली जात आहे.
या 'जन रसोई'मध्ये मिळणाऱ्या अन्नाच्या गुणवत्तेवरही विशेष लक्ष देण्यात आले आहे. जेवण चांगल्या गुणवत्तेच असून दररोज भाजीमध्येही बदल करण्यात येत आहे. तसेच जो मेडिकल स्टाफ हा संपूर्ण दिवस आयसोलेशन कक्षात तैनात आहे. त्यांनादेखील जेवणाची व्यवस्था इथूनच करण्यात आली आहे. वरिष्ठ चिकित्सक डॉ. व्ही.के. वर्मा आणि त्यांच्या संपूर्ण चमूने या भोजनव्यवस्थेकची जबाबदारी घेतली आहे. ते सर्व मिळून पोळ्या लाटण्यापासून भाजी बनवणे तसेच रुग्णांना वाढण्यापर्यंतची सर्व कामे जबाबदारी आणि कसोशिने पार पाडत आहेत.