नवी दिल्ली - राजधानी दिल्लीत झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर दिल्ली आणि आजूबाजूच्या परिसरात भाजीपाला आणि दैनिंदिन वस्तूंच्या किंमती वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. कारण माल वाहतूक करणारे ट्रक व्यावसायीक दिल्ली आणि आजूबाजूच्या परिसरात हिंसाचाराच्या भीतीने माल घेवून जाण्यास घाबरत आहेत.
दिल्लीपासून जवळ असलेल्या गाझियाबाद येथे भाजीपाला महागल्याचे स्थानिक विक्रेत्यांनी सांगितले. तसेच ट्रक चालक भीतीने दिल्ली आणि आजूबाजूच्या परिसरात जाण्यास तयार नसल्याचे ट्रान्सपोर्ट व्यावसायीकांनी सांगितले. गाझियाबाद येथील साहिबाबाद मार्केटमध्ये कांद्याच्या किमती ४ दिवसांत ४ ते ५ रुपयांनी वाढल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
ट्रान्सपोर्ट व्यायसायिक बी. एम मिश्रा यांनी सांगितले की, ड्रायव्हर ट्रक दिल्लीला नेण्यास तयार नाहीत. राजस्थान, हरियाणात जाण्यासाठीही दिल्लीतून जावे लागते. त्यामुळे आजूबाजूच्या राज्यातही वस्तूंचा पुरवठा कमी झाला आहे. ५० टक्के काम ठप्प झाले असून परिस्थिती सुधारली नाही तर मोठा परिणाम होणार आहे.