जयपूर - राजस्थानमध्ये १९ जूनला होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, आमदारांचा घोडेबाजार होऊ नये यासाठी काँग्रेसने आपले आमदार हॉटेलमध्ये ठेवले होते. यानंतर आता, भाजपनेही आपल्या आमदारांना शहरातील क्राऊन प्लाझा या हॉटेलमध्ये हलवले जाणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जयपूरमध्ये असलेल्या पक्षाच्या मुख्यालयात आज भाजप आमदारांची बैठक होणार आहे, त्यानंतर त्यांना बसेसमधून क्राऊन प्लाझा या हॉटेलमध्ये पाठवण्यात येणार आहे. १९ जूनपर्यंत ते या हॉटेलमध्ये राहतील, असे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
याबाबतचा निर्णय हा साधारणपणे महिनाभर आधीच घेण्यात आला होता. आमदारांच्या प्रशिक्षणासाठी आणि इतर काही कामांसाठी त्यांना हॉटेलमध्ये ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती राज्य भाजपचे अध्यक्ष सतीश पूनिया यांनी दिली.
यासोबतच, राज्याच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे या १८ जूनला जयपूरला पोहोचणार असल्याची माहिती मिळाली आहे.
दरम्यान, यावेळी दोन्ही पक्षांमध्ये २० ते ३० नवे आमदार निवडून आल्यामुळे, घोडेबाजार होण्याची भीती दोन्ही पक्षांना आहे अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. या आमदारांनी यापूर्वी कधीही राज्यसभेमध्ये मतदान न केल्यामुळे त्यांना प्रशिक्षणाची गरज आहे, जेणेकरून मतदानाच्या दिवशी कोणताही गोंधळ होऊ नये.
हेही वाचा : 'कोरोना रुग्णाच्या उच्च मृत्यूदराने गुजरातचे मॉडेल पडले उघडे'