नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयातील वकील उत्सव बैन्स यांनी नुकताच सरन्यायाधीश रंजन गोगोई यांना लैंगिक शोषणाच्या प्रकरणात अडकवण्यासाठी दीड कोटींची ऑफर मिळाल्याचा धक्कादायक दावा केला होता. 'याचा खरा पुरावा म्हणजे सीसीटीव्ही फुटेज माझ्याकडे आहे. मी ते न्यायालयाला सादर करत आहे. हा आरोपी मास्टरमाईंड आणि अतिशय 'पॉवरफुल' आहे,' असे उत्सव यांनी न्यायालयाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात (अॅफिडेव्हिट) म्हटले आहे.
यानंतर 'सर्वोच्च न्यायालयाचे ३ माजी कर्मचारी सरन्यायाधीशांच्या विरोधात का उठले आहेत? त्यांना ते प्रबळ लॉबींच्या मदतीने एखाद्या प्रकरणात का गुंतवू इच्छितात याबाबत तुमची भूमिका तयार करणाऱ्या मुद्द्याची सविस्तर माहिती द्यावी, असे सर्वोच्च न्यायालयाने वकील उत्सव यांना सांगितले आहे. याचे प्रतिज्ञापत्र तयार करून उद्या साडेदहा वाजता जेव्हा या प्रकरणाची न्यायालयात सुनावणी होईल, तेव्हा ते सादर करण्यास सांगितले.
सरन्यायाधीश रंजन गोगोई यांना अडकवण्यासाठी मोठा कट शिजत आहे, असे उत्सव यांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाने या प्रतिज्ञापत्रात उघड करण्यात आलेल्या माहितीविषयी चिंता व्यक्त केली आहे. वकील उत्सव यांनी सीबीआयचे संचालक, दिल्लीचे पोलीस आयुक्त आणि इंटलिजेन्स ब्युरोचे संचालक यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली आहे. न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांनी अॅटर्नी जनरल के. के. वेणूगोपाल यांना सीबीआयच्या संचालकांना या ठिकाणी चेंबरमध्ये बोलावू शकता का, अशी विचारणा केली आहे. याप्रकरणी आज दुपारी ३ वाजता सर्वोच्च न्यायालयाचे विशेष पीठ एकत्र आले. त्यांनी वकील उत्सव यांना आणखी एका प्रतिज्ञापत्रात सर्वोच्च न्यायालयाचे माजी कर्मचारी सरन्यायाधीशांविरोधात का कट रचत आहेत, याविषयी सविस्तर माहिती देण्यास सांगितले आहे.
कोण आहेत उत्सव बैन्स?
सर्वोच्च न्यायालयाच्या एका तरुण वकिलाने सरन्यायाधीश रंजन गोगोई यांना लैंगिक शोषणाच्या प्रकरणात अडकवण्यासाठी एका व्यक्तीने आपल्याला 'दीड कोटी रुपयांची ऑफर' केल्याचा धक्कादायक दावा केला होता. उत्सव बैन्स असे या वकिलाचे नाव आहे. एका अज्ञात व्यक्तीने आपल्या कार्यालयात येऊन आपल्याला ही 'ऑफर' दिल्याचा दावा त्याने केला होता. याविषयी त्याने सविस्तरपणे त्याच्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिले आहे.