नवी दिल्ली - काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांच्या दिल्लीतील निवासस्थानी काही अज्ञातांनी हल्ला केला. मंगळवारी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास हा प्रकार घडला. यावेळी चौधरी हे संसदेत उपस्थित होते.
सायंकाळी साडेपाचच्या सुमारास मला घरातील एका नोकराने फोन करून सांगितले, की काही लोक जबरदस्तीने घरात घुसून घरातील नोकरांना मारहाण करत आहेत, असे चौधरी यांचे सहाय्यक प्रदीप्तो यांनी सांगितले. ते लोक नोकरांना मारहाण करत, अधीर रंजन यांच्याविरोधात घोषणाबाजी करत होते. जोपर्यंत आम्ही घरी पोहोचलो, तोपर्यंत ते पसार झाले होते. आम्ही गेल्यावर पाहिले, की घराबाहेर असणाऱ्या कार्यालयातील सर्व सामान अस्ताव्यस्त आहे, ते लोक जाताना काही महत्त्वाच्या फाईल्सही घेऊन गेले होते; प्रदीप्तो म्हणाले.
याबाबत आता पोलिस तपास सुरू आहे. प्रदीप्तो यांच्यामते हा हल्ला वैयक्तिक नाही तर राजकीय हेतूने झाला असावा. चौधरी यांचे घर हे दिल्लीतील हुमायून रोडवर आहे. त्यांच्या घराबाहेरच त्यांचे कार्यालयही आहे. या कार्यालयावरच अज्ञातांनी हल्ला केला होता. विशेष म्हणजे, यावेळी अधीर रंजन यांची ११ वर्षांची मुलगीही त्यांच्या घरात होती.
सोमवारीच अधीर रंजन यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोशल मीडिया सोडण्याचे संकेत दिल्यानंतर, सोशल मीडिया सोडण्याऐवजी दिल्लीतील दंगलीची जबाबदारी घेत पंतप्रधानांनी आपले पद सोडावेत, असे त्यांनी म्हटले होते.
हेही वाचा : जयपूरमधील कोरोनाग्रस्त इटालियन नागरिकाच्या पत्नीलाही झाली विषाणूची लागण..