कोलकाता - काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील पक्षाचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी पीएम गरीब कल्याण योजनेच्या अंमलबजावणीवरून शंका उपस्थित केली आहे. पश्चिम बंगाल राज्यातील एकाही जिल्ह्याचा या योजनेत समावेश करण्यात आला नाही. यावरून त्यांनी पंतप्रधानांना पत्रही लिहले आहे.
अधीर रंजन चौधरी मुर्शिदाबाद या त्यांच्या मतदारसंघात पत्रकारांशी बोलत होते. 'केंद्र सरकारने देशभरातील ११६ जिल्ह्याचा समावेश या योजनेत केला आहे. ५० हजार कोटी रुपयांची ही योजना आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये २५ हजारांपेक्षा जास्त स्थलांतरीत कामगारांची संख्या आहे. त्यांचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे. सरकारच्या आकडेवारीनुसार, टाळेबंदी सुरू झाल्यापासून ११ लाख स्थलांतरीत मजूर पश्चिम बंगाल राज्यात परतले आहेत' असे ते म्हणाले आहेत.
या विषयी चौधरी यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहले आहे. तसेच एक लाख स्थलांतरीत मजूरांची माहिती मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना दिली आहे. तसेच गरीब कल्याण योजनेतून वगळण्यात आल्याबाबतचे पत्र मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना दिली आहे.