नवी मुंबई - कोरोना विषाणूमुळे सर्वत्र भयंकर परिस्थिती ओढवलेली असताना देखील काही महाभाग गरजेशिवाय बाहेर बाहेर पडताना दिसत आहेत. अशात लाॅकडाऊनमध्ये संचार बंदीचे उल्लंघन करून मॉर्निंगवॉक करणाऱ्या 72 जणांवर वाशी व ऐरोली पोलिसांनी कारवाई केली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन अधिक कडक करण्यात आले आहे. त्यामुळे बऱ्याचशा सोसायट्यांनी नियोजित वेळ टळून गेली की, प्रवेशद्वार बंद करण्याचे धोरण अवलंबिले आहे. मात्र, तरीही काही महाभाग अत्यावश्यक गोष्टींसाठी बाहेर जात आहोत, असे भासवून विनाकारण रस्त्यावर फिरत असतात.
सकाळी कोणीही नसल्याचा फायदा घेत परिसरात संचार बंदीच्या काळात मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडत आहेत, अशा ६३ लोकांना मॉर्निंग वॉक करत असताना वाशी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर, रबाळे पोलिसांनी 9 जणांना ताब्यात घेतले असून, त्यांच्यावर संचारबंदीचे उल्लंघन केले म्हणून कारवाई केली असल्याची माहिती, वाशी व रबाळे पोलिसांनी दिली आहे.