देहराडून - चंपावत जिल्ह्यातील बाराकोट येथे एक वृद्ध महिला विद्युत सब स्टेशनच्या स्क्रबरमध्ये राहत असल्याचे आढळले आहे. जयंती देवी असे नाव असलेली ही महिला मागील दोन वर्षांपासून येथे राहत आहे. मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असलेली ही महिला येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांनी दिलेल्या गोष्टींवर आपला उदरनिर्वाह करत आहे.
विद्युत सब स्टेशनच्या स्क्रबरमध्ये राहत असलेल्या या महिलेबाबत स्थानिक प्रशासनाला काहीही माहिती नाही. काही दिवसांपूर्वी पोलीसांना या महिलेबाबत माहिती मिळाली. लोहाघाट पोलीस ठाण्याचे प्रमुख मनीष खत्री यांनी जयंती देवीला जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला.
जयंती देवी विद्युत सब स्टेशनच्या स्क्रबरमध्ये राहत असल्याने त्यांच्या जिविताला नक्कीच धोका आहे. आसपासच्या गवताला आग लागली किंवा पावसाळ्यात विद्युत प्रवाह पसरल्यास त्यांचा जीवही जाऊ शकतो. या महिलेबाबात माहिती मिळाल्यानंतर प्रशासन काय उपाययोजना करते याकडे स्थानिकांचे लक्ष आहे.