नोएडा - नोएडातील सेक्टर 24 पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी कारला बनावट नंबर प्लेट लावून ओएलएक्सवर जाहिरात देऊन अनेकांची फसवणूक करणाऱ्याला अटक केली. आरोपीने त्याच्या मित्राची गाडी तब्बल 12 वेळा चोरून ती ओएलएक्सवरून विकली. हा डोकेबाज आरोपी गाडी विकायचा आणि मग पुन्हा तिची चोरी करून पुन्हा विक्री करायचा. पोलिसांनी गाडीसह बनावट नंबर प्लेट, दोन मोबाईल फोन, तीन बनावट पॅनकार्ड आणि तीन बनावट आधार कार्डे आरोपीकडून जप्त केली आहेत.
सेक्टर 24 पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी आरोपी मनोत्तम त्यागी याला अटक केली. जो मूळचा अमरोहाचा आहे. त्याचे सध्याचे निवासस्थान तिगडी गावात आहे. पोलिसांनी आरोपीकडून बनावट नंबर प्लेट, वॅगनआर कार, दोन मोबाइल फोन आणि बनावट पॅन कार्ड आणि बनावट आधार कार्ड आणि 10 हजार 720 रुपये जप्त केले.
हेही वाचा - बसपाच्या सात आमदारांची हकालपट्टी - मायावतींची माहिती
आरोपी ओएलएक्सवर विक्रीसाठी बनावट नंबर प्लेट लावत असे. त्यानंतर गाडीचे फोटो काढून त्याची ओएलएक्सवर जाहिरात देत असे. त्याचवेळी आरोपी गाडीत जीपीएसही लावत असे. त्यानंतर, तो ग्राहकाला भेटला आणि त्याच्याकडून पैसे घेत असे. कधी गाडी सुरू होत नसल्याचे निमित्त करून, तर कधी कागदपत्रांची झेरॉक्स कॉपी करण्याचे निमित्त करून गाडीसह तेथून पोबारा करत असे.
एकदा या आरोपीने त्याच पद्धतीने एका ग्राहकाला स्विफ्ट कार 2 लाख 30 हजारांना विकली. त्यानंतर, जीपीएसच्या मदतीने कारचा शोध लावून दुसऱ्या किल्लीच्या मदतीने गाडीची चोरी केली. याप्रकरणी सेक्टर 24 पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे अतिरिक्त पोलीस आयुक्त रजनीश वर्मा म्हणाले.
आरोपीने राज्याच्या अन्य जिल्ह्यांत तसेच, उत्तराखंडमध्येही असेच गुन्हे केले आहेत. यासंदर्भात नोएडा आणि उत्तराखंडमध्ये त्याच्याविरोधात अनेक खटले दाखल आहेत.
हेही वाचा - राज्यसभा निवडणूक : अखिलेश यादवांनी बसपाचे सात आमदार फोडले