भोपाळ(बालाघाट) - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले. मात्र, विविध राज्यांत रोजगारासाठी गेलेल्या मजूरांना याचा मोठा फटका बसला. रोजगार थांबल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. हतबल झालेल्या मजूरांनी पायी आपल्या घरचा रस्ता धरला असून याबाबत काळीज हेलावून टाकणाऱ्या अनेक घटना समोर येत आहेत. मध्य प्रदेशातील बालाघाटमध्ये अशीच एक घटना समोर आली आहे. एक मजूर आपल्या गर्भवती पत्नी आणि मुलीला घेऊन ८०० किमी अंतर पार करत आला आहे.
रामू नाव असलेला हा मजूर कुंडेमोह गावचा रहिवासी असून तो हैदराबादहून पायी चालत आला आहे. गर्भवती पत्नी आणि मुलीला हाताने बनवलेल्या एका ओढगाडीवर बसून त्यांना ओढत त्याने बालाघाटपर्यंत आणले. या सतरा दिवसांच्या प्रवासादरम्यान त्याला कोणतीही मदत मिळाली नाही.
बालाघाटच्या रजेगाव सीमेवर बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांच्या नजरेस रामूचे कुटुंब पडले. पोलिसांनी तत्काळ लहान मुलीला चप्पल आणि खाण्यासाठी आणून देत सर्वांची आरोग्य तपासणी केली. त्यानंतर एका खासगी गाडीची व्यवस्था करून त्यांना त्यांच्या गावी रवाना केले.