पाटणा - बिहारमधील छपरा येथील खलपुरा येथे आज (२६ एप्रिल) विजांच्या कडकडाटांसह मुसळधार पाऊस झाला. यावेळी वीज पडून ९ जण जागीच ठार झाले, तर ६ जण गंभीर जखमी झाले आहेत. सदर रुग्णालयात जखमींवर उपचार सुरू आहे.
आज रविवार असल्याने काहीजण जमिनीची मोजणी करत होते, तर काही शेतात गहू काढत होते. सकाळी अचानक वातावरण बदलले आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे सर्वांनी आपल्या जीव वाचविण्यासाठी झोपडीकडे धाव घेतली. यावेळी विजांचा जोरदार कडकडाट झाला आणि वीज थेट झोपडीवर पडली. यामध्ये ९ जण जागीच ठार झाले. विपिन बिहारी सिंह, शशी भूषण सिंह, चंद्रकिशोर सिंह, बाली राय आणि बीरबल राय यांच्यासह सहाजण गंभीर जखमी झाले. ग्रामस्थांना माहिती मिळताच त्यांनी शेताकडे धाव घेतली. त्यानंतर जखमींना सदर रुग्णालयात हलविण्यात आले.