जोधपूर - जिल्ह्यातील बासनी औद्योगिक क्षेत्रात मंगळवारी सायंकाळी इमारत कोसळ्याने मोठा अपघात झाला आहे. निर्माणाधीन इमारतीची भिंत कोसळल्याने 9 जणांचा मृत्यू तर 6 जण जखमी झाले. या घटनेनंतर मृतांच्या कुटुंबांना 2 लाख रुपये आणि जखमींना 4 हजार रुपये मदत देण्याची घोषणा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केली आहे. घटनेचा बारकाईने तपास केला जात असल्याचे जिल्हाधिकारी इंद्रजित सिंह यांनी सांगितले.
मृतांपैकी बहुतेक बाडमेर आणि प्रतापगड जिल्ह्यातील रहिवासी असून ते येथे काम करीत होते. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त व उच्च पोलीस अधिकारीही घटनास्थळी पोहोचले. सध्या महापालिका कर्मचारी, एसडीआरएफ आणि नागरी संरक्षण यांच्या पथकाच्या सहाय्याने पोलीस कर्मचाऱ्याकडून इमारतीचे ढिगारा हटवण्याचे काम सुरू आहे.
अपघातानंतर कंत्राटदाराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच मालकाचा शोधही सुरू आहे. या घटनेत जो दोषी असेल त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असेही जोधपूर पोलिसांनी सांगितले. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी अपघातवर संवेदना व्यक्त केल्या. जोधपूरच्या बासनीमध्ये निर्माणाधीन इमारत कोसळल्यामुळे कामगारांच्या मृत्यूची माहिती अत्यंत खेदजनक आहे. असे ट्विट केले. जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून घटनेची माहिती घेतली. अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू असून घटनास्थळी स्थानिक पोलिस व प्रशासन उपस्थित आहे, असे टि्वट त्यांनी केले.